निर्ढावलेल्या आरोपीची नागपुरातील पोलीस ठाण्यात भाईगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 09:02 PM2019-11-12T21:02:00+5:302019-11-12T21:03:13+5:30

बसचालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना आरोपी आतमध्ये आला आणि त्याने चक्क पोलिसांसमोरच बसचालकाच्या कानशिलात लगावली.

Harden criminal's Bhaigiri in police station at Nagpur | निर्ढावलेल्या आरोपीची नागपुरातील पोलीस ठाण्यात भाईगिरी

निर्ढावलेल्या आरोपीची नागपुरातील पोलीस ठाण्यात भाईगिरी

Next
ठळक मुद्देबसचालकाला ठाण्यातच मारले : सीताबर्डीत घटना, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिग्नलवर उतरण्यास मनाई केली म्हणून एका आरोपीने बसचालकासोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर बसचालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना तो आतमध्ये आला आणि त्याने चक्क पोलिसांसमोरच बसचालकाच्या कानशिलात लगावली. सोमवारी सकाळी १०.१० वाजता सीताबर्डी पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. आदित्य युवराज आटोने (वय ३२, रा. साखरे गुरूजी शाळेसमोर,सिंदी खाना गणेशपेठ) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मनोज वासुदेवराव घोडसे (वय ३२) हे तेलकामठी, कळमेश्वर येथे राहतात. ते राज्य परिवहन महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सकाळी १०. १० वाजता सावनेरहून प्रवासी भरलेली बस घेऊन नागपुरात आले. मोरभवनात जात असताना सिग्नल बंद असल्यामुळे त्यांनी झाशी राणी चौकात बस थांबवली. बसमध्ये असलेल्या आदित्य याने सिग्नलवर बसचे दार उघडून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. गर्दी असल्यामुळे आणि आजूबाजूने वाहन येत असल्याने बसचालक घोडसेंनी त्याला मनाई केली. यावेळी आरोपीची बसचालकासोबत बाचाबाची झाली. परिणामी घोडसेने बस थांबवून सरळ सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ते पोलीस ठाण्याच्या हॉलमध्ये तक्रार नोंदवित असताना आरोपी आटोने तेथे आला आणि त्याने पोलिसांच्या समोरच घोडसेच्या कानशिलात लगावली. पोलीस ठाण्यात सर्वांसमक्ष सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी आटोनेला कसेबसे आवरले. नंतर त्याला शासकीय कामात अडसर निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

न्यायालयीन कोठडीत रवानगी
आरोपी आदित्य आटोने हा बड्या घरचा असल्याचे समजते. पोलीस ठाण्यात पोलीस असतानाच त्याने हा निर्ढावलेपणा दाखवल्याने काही वेळेसाठी पोलीसही स्तंभीत झाले होते. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आज त्याची न्यायालयीन कस्टडीत रवानगी केली.

Web Title: Harden criminal's Bhaigiri in police station at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.