Hanged in Nagpur due to illegal moneylender's harassment | नागपुरात अवैध सावकाराच्या जाचामुळे लावला गळफास

नागपुरात अवैध सावकाराच्या जाचामुळे लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अवैध सावकाराचा त्रास असह्य झाल्यामुळे कर्जदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत उघड झाली आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सावकार गुलाब यज्ञनारायण दुबे (वय ४८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृताचे नाव हेमंत विजयराव खराबे (वय ५०) आहे.

खराबे प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्नेहनगरात राहत होते. त्यांनी आरोपी म्हाडा कॉलनी निवासी गुलाब दुबे कडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. लॉकडाऊनमुळे कर्जाची रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे खराबे यांना आरोपी गुलाब दुबे कमालीचा त्रास देत होता. वारंवार फोन करून आणि भेटायला बोलून मानसिक त्रास देतानाच धमक्याही देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून २८ सप्टेंबर रोजी खराबे यांनी गळफास लावून घेतला. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान पोलीस चौकशीत खराबे यांनी अवैध सावकारी करणारा आरोपी गुलाब दुबे यांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रतापनगर पोलिसांनी स्नेहा हेमंत खराबे यांची तक्रार नोंदवून शुक्रवारी आरोपी गुलाब दुबेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच कलम ३०६ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Hanged in Nagpur due to illegal moneylender's harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.