क्वारंटाईन स्टॅम्पमुळे हातावर जखम; पुण्याहून नागपुरात आलेल्या दाम्पत्याला घ्यावा लागला उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:24 IST2020-06-08T12:23:43+5:302020-06-08T12:24:02+5:30
दुसऱ्या जिल्ह्यासह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर मारला जाणाऱ्या होम क्वारंटाईनच्या स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहेत. पुणे येथून नागपुरात आलेल्या एका दाम्पत्याच्या हातावर असाच स्टॅम्प मारल्यानंतर हातावर सूज येऊन त्यात पस जमा झाला. अखेर या दाम्पत्याला डॉक्टरांकडून उपचार घेण्याची वेळ आली.

क्वारंटाईन स्टॅम्पमुळे हातावर जखम; पुण्याहून नागपुरात आलेल्या दाम्पत्याला घ्यावा लागला उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या जिल्ह्यासह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर मारला जाणाऱ्या होम क्वारंटाईनच्या स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहेत. पुणे येथून नागपुरात आलेल्या एका दाम्पत्याच्या हातावर असाच स्टॅम्प मारल्यानंतर हातावर सूज येऊन त्यात पस जमा झाला. अखेर या दाम्पत्याला डॉक्टरांकडून उपचार घेण्याची वेळ आली.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानसेवा, रेल्वेसेवा सुरू झाल्याने जे लॉकडाऊनमध्ये विविध शहरात अडकले होते, ते आता घरी परतू लागले आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेस्थानक व विमानतळावर अशा प्रवाशांच्या हातावर १४ दिवसाचे होम आयसोलेशन म्हणजेच क्वारंटाईनचा स्टॅम्प मारला जात आहे. मुंबई येथे नोकरी करणारे स्नेहा मून व राकेश मून यांचे चंद्रपूरला घर आहे. ते ५ जून रोजी घरी येण्यासाठी मुंबई ते पुणे आणि पुण्यावरून विमानाने नागपूरला पोहचले. विमानतळावर उतरल्यावर सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर दोघांच्या हातावर क्वारंटाईनचा स्टॅम्प मारण्यात आला. दोघांच्या हातावर स्टॅम्प मारलेल्या जागेवर सायंकाळी सूज आली. त्यांनी कुटुंबातील डॉ. सिद्धांत भरणे यांना फोनवरून याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी स्टॅम्प जागेवर जखम होऊन पस भरला. दोघांच्या हातावर सारखीच जखम झाली. डॉ. भरणे यांनी त्यांच्यावर उपचाराला सुरुवात केली. स्टॅम्पच्या नाहक त्रासाला या दाम्पत्याला सामोरे जावे लागले.
स्ट्राँग केमिकल्समुळे व ज्यांना अॅलर्जी आहे त्यांना त्रास होतो
१४ दिवसापर्यंत शाई हातावर टिकावी यासाठी स्ट्राँग केमिकल्स असलेल्या शाईचा बहुदा वापर केला जात असावा. ज्यांना अॅलर्जी आहे त्यांना या शाईचा त्रास होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत ‘अॅलर्जीक कॉन्टॅक्टडर्मेटायटीस’ असे म्हटले जाते. यात रुग्णाच्या हाताला सूज येऊन, पस तयार होतो. यावर उपचार आवश्यक आहे.
-डॉ. जयेश मुखी
त्वचारोग तज्ज्ञ, मेडिकल.
आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले
याप्रकारची आणखी एक तक्रार आली होती. यासंबंधात आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले आहे.
-आबिद रुही,
वरिष्ठ विमानतळ संचालक