अगरबत्ती तयार करणारे हात होणार बेकार
By Admin | Updated: October 27, 2014 00:30 IST2014-10-27T00:30:52+5:302014-10-27T00:30:52+5:30
बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे.

अगरबत्ती तयार करणारे हात होणार बेकार
हजारो कारागिरांवर बेरोजगारीचे संकट : एकट्या उत्तर नागपुरातच चार हजार कारागीर
नागपूर : बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे. नागपूर आणि परिसरातील हजारो महिलांचे हात यंत्रामुळे बेकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नागपूर, कामठी, गोंदिया, भंडारा या परिसरात पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती तयार करणारे हजारो कारागीर आहेत. या पारंपरिक उद्योगाने विशेषत: झोपडपट्ट्यांमधील महिलांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकट्या उत्तर नागपुरातच सुमारे चार हजार कारागिरांचे कुटुंब या उद्योगावर अवलंबून आहेत. उत्तर नागपुरातील झोपडपट्ट्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती करण्याचे छोटे-छोटे घरगुती कारखाने आहेत. १० महिलांपासून ते ४०० महिलांपर्यंतच्या लोकांना एकेका कारखान्याने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या कारागिरांनी तयार केलेला माल मोठे व्यापारी विकत घेतात आणि आकर्षक पॅकेजिंग करून ते विकतात, असा हा व्यापार चालतो.
अगरबत्ती तयार करणे ही एक कला आहे. कोळसा, मैदा, नुरवा यांच्या मिश्रणातून पावडर तयार केली जाते. यात विविध प्रकारचे सेंट टाकून अगरबत्ती बनवली जाते. अगरबत्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काड्याही विविध प्रकारच्या असतात. आसाम आणि बालाघाट येथील विशिष्ट बांबुपासून या काड्या तयार केल्या जातात. सध्या बालाघाटी काडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एका महिलेला हजार अगरबत्तीमागे पूर्वी १५ ते १८ रुपये रोजी मिळत असे.
प्रत्येक जण दिवसभरात किमान १०० रुपये रोजी मिळवतात. अनेक जणांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य अगरबत्ती तयार करतात. अनेकांनी तर सुट्यांमध्ये आणि फावल्या वेळात अगरबत्ती तयार करून आपले शिक्षण पूर्ण केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून नागपूर आणि परिसरातील हा व्यवसाय संकटात सापडला आहे.
मोठ्या व्यापाऱ्यांनी आता अगरबत्ती तयार करण्यासाठी यंत्र वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे येथील पारंपरिक कारागीर बेरोजगार झाले आहे. उत्तर नागपुरातील एकेक कारखाना बंद पडू लागला आहे. कारागिरांची रोजगारासाठी वणवण सुरू आहे. (प्रतिनिधी)