नागपुरात अनधिकृत बहुमजली चार इमारतीवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:16 IST2019-11-16T20:13:04+5:302019-11-16T20:16:31+5:30
नासुप्रच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने शनिवारी मौजा बाभूळखेडा परिसरातील शुक्लानगर येथील चार अनधिकृत बहुमजली इमारतीवर हातोडा चालविला.

नागपुरात अनधिकृत बहुमजली चार इमारतीवर हातोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नासुप्रच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने शनिवारी मौजा बाभूळखेडा परिसरातील शुक्लानगर येथील चार अनधिकृत बहुमजली इमारतीवर हातोडा चालविला. पथकाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत १६ अनधिकृत बांधकाम तोडले होते. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली.
सकाळी ११.३० च्या सुमारास पथकाने दोन जेसीबी व दोन पोकलेनच्या साहाय्याने कारवाईला सुरुवात केली. गभणे, पांडव व मधूकर वानखेडे आदींची दोन मजली घरे तोडण्यात आली. तर मुरेकर यांचे तीन मजली घर पाडण्यात आले. सायंकाळी ७ पर्यंत पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू होती.
पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तिसऱ्या दिवशी एक तीन मजली इमारत पाडली जाणार आहे. त्यानंतर नासुप्रतर्फे कारवाई बाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे.
ही कारवाई कार्यकारी अभियंता (दक्षिण) संजय चिमूरकर, सहायक अभियंता संदीप राऊत, रवी रामटेके, विनोद खुळगे, महेश चौधरी, यशोधरा माणिक, सारिका बोरकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.