देशात एकूण २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क १ जूनपासून बंधनकारक; एचयूआयडी क्रमांक महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 19:03 IST2022-05-31T18:58:50+5:302022-05-31T19:03:35+5:30
Nagpur News केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने २०२१ मध्ये पहिल्या टप्प्यात २५८ जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक केले, तर आता दुसऱ्या टप्प्यात १ जूनपासून ३२ जिल्ह्यांमध्ये बंधनकारक होणार आहे.

देशात एकूण २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क १ जूनपासून बंधनकारक; एचयूआयडी क्रमांक महत्त्वाचा
नागपूर : भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) दागिन्यांची विक्री करताना सराफांना हॉलमार्किंग आणि दागिन्याचा हॉलमार्क युनिक आयडेन्टिफिकेशन (एचयूआयडी) बंधनकारक केला आहे. नवीन व्यवस्थेत दागिने तयार करणारे ज्वेलर्स, खरेदीदारांचे नाव, वजन आणि किंमतीसह सर्वकाही पोर्टलवर नोंद करावी लागेल. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने २०२१ मध्ये पहिल्या टप्प्यात २५८ जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक केले, तर आता दुसऱ्या टप्प्यात १ जूनपासून ३२ जिल्ह्यांमध्ये बंधनकारक होणार आहे.
सरकारच्या पायाभूत सुविधा नसलेल्या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग लागू करू नये, अशी मागणी ऑल इंडिया ज्वेलर्स ॲण्ड गोल्ड स्मिथ फेडरेशनने केली होती. त्यानुसार सरकार टप्प्याटप्प्याने देशात हॉलमार्किंग लागू करीत आहे. दोन टप्प्यातून एकूण २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग लागू होणार आहे. नवीन व्यवस्थेत हे दागिने आमच्या शोरूमचे नसल्याचे ज्वेलर्सला म्हणता येणार नाही. दुसऱ्या टप्प्यात बीआयएस कुंदन, पोल्की, जडाऊवर हॉलमार्क लागू करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात सूचना मागविण्यात आल्या आहेत. नवीन व्यवस्थेत टाका लावलेल्या दागिन्यांची तपासणी हॉलमार्क सेंटरवर करण्यात येऊ शकेल.
काय होणार फायदे :
- दागिने तयार करणारे ज्वेलर्स आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा एचयूआयडी पोर्टलवर माहितीसह अपलोड करावा लागेल.
- दागिन्यांच्या मालकासह वजन आणि किंमतही राहील.
- दागिने तयार करण्यापासून खरेदीपर्यंतची सर्व माहिती पोर्टलवर राहील.
- कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल.
- या प्रक्रियेत खरेदीदारांचा फायदा होणार आहे.