सरकार नागपुरात असताना रस्त्यावर जाळपोळ; लालगंज-कुंभारपुऱ्यात हलबा आक्रमक, टायर जाळून व्यक्त केला संताप
By योगेश पांडे | Updated: December 10, 2025 23:43 IST2025-12-10T23:41:43+5:302025-12-10T23:43:38+5:30
हलबा समाजाच्या प्रमुख मागण्यांसंबंधात शासनासोबत अनेकदा चर्चा झाली परंतु अद्यापही मागण्या प्रलंबित आहेत

सरकार नागपुरात असताना रस्त्यावर जाळपोळ; लालगंज-कुंभारपुऱ्यात हलबा आक्रमक, टायर जाळून व्यक्त केला संताप
नागपूर : हलबा समाजाच्या मागण्या अद्यापही प्रलंबित असून समाजाच्या प्रतिनिधींच्या उपोषणाला कुणीही भेट न दिल्याचा संताप बुधवारी रात्री मध्य नागपुरातील रस्त्यांवर उमटला. काही तरुणांनी लालगंज, कुंभारपुरासह काही भागांत टायर जाळून संताप व्यक्त केला. तसेच नारेबाजी करत रस्ता रोको करण्याचादेखील प्रयत्न केला. शहरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना अशी घटना झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता व पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली.
हलबा समाजाच्या प्रमुख मागण्यांसंबंधात शासनासोबत अनेकदा चर्चा झाली परंतु अद्यापही मागण्या प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांकरिता विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हलबा समाजाचे डॉ.सुशील कोहाड आणि हलबा क्रांती सेनेचे अध्यक्ष जगदीश खापेकर हे गांधीबाग येथे उपोषण आंदोलन करीत आहेत. मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांनीदेखील विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. शिवाय गुरुवारी माजी आमदार बच्चू कडू यांच्या सभेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. पाच डिसेंबरपासून उपोषण सुरू असतानादेखील प्रशासनातील मोठे अधिकारी किंवा कुठल्याही मंत्र्याने भेट दिली नसल्याने हलबा समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यातूनच काही तरुणांनी बुधवारी रात्री लालगंज, कुंभारपुरा, झाडे चौक, कांजी हाऊस, बांगलादेश या भागात निदर्शने केली व रस्त्यावर टायर जाळले. काही तरुणांनी रस्ता थांबविण्याचादेखील प्रयत्न केला. याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. दरम्यान, यासंदर्भात जगदीश खापेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा घटना झाल्याचे कानावर आल्याचे सांगितले. परंतु आम्ही शांततेच्या मार्गाने मागण्या मांडत आहोत. सर्वांनी शांती पाळावी व कुणीही कायदा हाती घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.