जरीपटक्यात गुंडाचा हैदोस

By Admin | Updated: December 28, 2016 03:31 IST2016-12-28T03:31:55+5:302016-12-28T03:31:55+5:30

जरीपटक्यातील रिपब्लिकन नगरात राहणारा कुख्यात विक्की शरद मोटे (वय २७) याने सोमवारी

Hades in the pocket of the punk | जरीपटक्यात गुंडाचा हैदोस

जरीपटक्यात गुंडाचा हैदोस

चाकू-सुऱ्याचा धाक : वर्दळीच्या ठिकाणी एकापाठोपाठ चौघांना लुटले
नागपूर : जरीपटक्यातील रिपब्लिकन नगरात राहणारा कुख्यात विक्की शरद मोटे (वय २७) याने सोमवारी रात्री इंदोऱ्यात धारदार चाकू आणि सुऱ्याच्या धाकावर हैदोस घातला. अवघ्या अर्ध्या तासात भर रस्त्यावर एकापाठोपाठ चौघांना लुटले. या लुटमारीमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
आरोपी मोटे दारूच्या नशेत तर्र होता. त्याने सोमवारी रात्री ७ ते ७.३० या वेळेत रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. तो हातात धारदार सुरा घेऊन कुणाच्याही मागे धावत होता. प्रारंभी त्याने भूपेंद्र अर्जुनदास मेश्राम (वय ४५) आणि अनिल कोचे घराकडे जात असताना त्यांना रोखले. सुऱ्याचा धाक दाखवून मेश्राम यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. तर, अनिल कोचे यांच्या गळ्यावर सुरा लावून त्यांना जखमी केल्यानंतर त्यांच्या खिशातून ५०० रुपये हिसकावून घेतले. याच वेळी रस्त्याने जाणारे धीरज लोणारे यांना शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला तर नंतर अशोक मछले यांच्यावर धाव घेऊन त्यांच्या खिशातील २५० रुपये हिसकावून घेतले.
भर रस्त्यावर त्याची लुटमार सुरू असल्यामुळे अनेकांनी भीतीमुळे तेथून पळ काढला. मेश्राम यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Hades in the pocket of the punk