रानडुकरांचा हैदाेस, पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:17+5:302021-02-14T04:10:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी, महेंद्री शिवारात रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ते शेतातील गहू, हरभरा ...

रानडुकरांचा हैदाेस, पिकांची नासाडी
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी, महेंद्री शिवारात रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ते शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकांची प्रचंड नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. त्यामुळे वन विभागाने या रानडुकरांचा कायम बंदाेबस्त करावा तसेच झालेल्या बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
जलालखेडा परिसरात जंगल असले तरी आजवर शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा फारसा त्रास हाेत नव्हता. अलीकडच्या काळात नीलगाई (राेही) व रानडुकरांचा वावर या भागात वाढत चालला आहे. सध्या शेतात रबी व भाजीपाल्याची पिके आहेत. खरीप पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांनी रबी पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मागील काही दिवसापासून चांदणीबर्डी व महेंद्री शिवारात रानडुकरांनी कापणीला आलेले गहू व हरभऱ्याच्या तसेच भाजीपाल्याच्या पिकांची नासाडी करायला सुरुवात केली आहे.
रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर थंडीत कुडकुडत शेतात थांबतात. मात्र, त्याचा फारसा फायदा हाेताना दिसून येत नाही. कापणीला आलेले हरभऱ्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याची माहिती महेंद्री येथील शेतकरी नारायण नाखले यांनी दिली. असाच प्रकार अन्य शेतकऱ्यांच्या शेतात घडला आहे. त्यामुळे वन विभागाने या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि नेहमीप्रमाणे तुटपुंजी नुकसान भरपाई न देता ती बाजारभावाप्रमाणे द्यावी तसेच या रानडुकरांचा कायम बंदाेबसत करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
...
कायम बंदाेबस्त करा
नरखेड तालुक्यातील काही भागात नीलगाई (राेही) तर काही भागात रानडुकरांचा वावर प्रचंड वाढला आहे. वन्यप्राणी शेतातील पीक नष्ट करीत असल्याने शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक संकटांना सामाेरे जावे लागते. या प्राण्यांना सांभाळण्याची जबाबदारी वन विभागाची असल्याने त्यांनी वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यावी. ते शेत अथवा नागरी वस्तीच्या दिशेने आल्यास त्यांचा वेळीच बंदाेबस्त करावा. वन कर्मचाऱ्यांना वन्यप्राणी सांभाळता येत नसल्याने त्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची लेखी परवानगी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणीही काही शेतकऱ्यांनी केली आहे.