बांबू वनात वाघिणीसह दोन बछड्यांचा अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:43+5:302021-06-02T04:08:43+5:30
उमरेड : येथून २२ किलोमीटर अंतरावरील चिखलापार-नाड परिसरात रमेश डुंभरे यांच्या बांबू वनात मंगळवारी सकाळीच वाघीण आणि तिच्या दोन ...

बांबू वनात वाघिणीसह दोन बछड्यांचा अधिवास
उमरेड : येथून २२ किलोमीटर अंतरावरील चिखलापार-नाड परिसरात रमेश डुंभरे यांच्या बांबू वनात मंगळवारी सकाळीच वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा अधिवास आढळून आला. सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बाबा राऊत आणि गुलाब मस्की हे दोन शेतमजूर बांबू वनात जात होते. अशातच बांबू वनात त्यांना एकाच वेळी वाघीण आणि दोन बछडे नजरेस पडले. दोघांचीही घाबरगुंडी उडाली. क्षणार्धात गाव परिसरात ही तीन वाघ दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. उमरेडसह अवतीभवतीच्या गावातील नागरिकांची गर्दी घटनास्थळी उसळली. लागलीच दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील वनविभागाचा चमूसुद्धा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर क्षणभरातच गाव परिसरात वाऱ्यासारखी बातमी पसरली. बांबू वनात गारवा आणि पाण्याची सोय असल्याने या वाघिणीने आणि तिच्या दोन बछड्यांनी मुक्काम ठोकला असावा. वाघीण आणि तिचे दोन बछडे बांबूच्या शेतातच तळ ठोकून होते, अशी माहिती रमेश डुंभरे, सतीश चौधरी यांनी दिली.
---
चिखलापार, बेसूर, नाड, शिवनफळ शिवारात वाघ असल्यामुळे आणि हा परिसर जंगलाने वेढलेला असल्याने नेहमीप्रमाणे वाघीण आणि दोन बछडे भ्रमण करीत होते. गावकऱ्यांची गर्दी वाढली. आम्ही रस्ता मोकळा केला. संपूर्ण चमू नजर ठेवून आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
वैशाली झरे, वनपरिक्षेत्र अधिकारी उमरेड, दक्षिण उमरेड