बालिकेला घरात नेऊन अश्लील चित्र बघण्याची लावली सवय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 22:04 IST2021-12-30T22:03:57+5:302021-12-30T22:04:25+5:30
Nagpur News शेजारी राहणाऱ्या दोन आरोपींनी एका आठ वर्षांच्या बालिकेला वेगवेगळ्या वेळी घरात नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली.

बालिकेला घरात नेऊन अश्लील चित्र बघण्याची लावली सवय
नागपूर - शेजारी राहणाऱ्या दोन आरोपींनी एका आठ वर्षांच्या बालिकेला वेगवेगळ्या वेळी घरात नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. निखिल बंडू नेवारे (वय २४) आणि मनोहर दाैलत शेलारे (वय ७०), अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित बालिकेच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे घराशेजारीच राहतात. वेगवेगळ्या बहाण्याने हे दोन भामटे वेगवेगळ्या वेळी बालिकेला आपल्या घरात नेऊन तिचे लैंगिक शोेषण करीत होते. कुणाला काही सांगू नये म्हणून तिला धाकही दाखवीत होते. १२ ऑक्टोबर ते २१ डिसेंबरपर्यंत हा गैरप्रकार सुरू होता. आरोपींनी मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफित बघण्याची सवय लावली. त्यामुळे ही निरागस बालिका आपल्या आईचा मोबाईल घेऊन तशा चित्रफित बघत होती.
२१ डिसेंबरला ती अशीच चित्रफित बघत असल्याचे दिसल्याने आईने तिला रागावले. नंतर कुठे शिकली, असा सहज प्रश्न केला असता बालिकेने या दोघांची नावे सांगितली. त्यामुळे आईने तिच्यावर आणि आरोपींवर नजर ठेवली. बुधवारी बालिकेला आरोपींनी जवळ बोलविताच आईने त्यांचा पाणउतारा करून बुधवारी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
उलटसुलट चर्चा
बालिका एवढी निरागस आहे की तिला याबाबत काहीही सांगता-बोलता येत नाही. ती केवळ मोबाईलच्या अश्लील चित्रफितीकडे संकेत करते. विशेष म्हणजे, तक्रारदार पालक आणि आरोपी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. आरोपी शेलारेला नातू-पणतू आहे. या घटनेच्या अनुषंगाने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वैद्यकीय तपासणीत बालिकेला कोणतीही दुखापत नसल्याचे उघड झाल्याने, पालक तसेच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
---