ग्वालबन्सी टोळीला अधिकाऱ्यांची साथ

By Admin | Updated: May 8, 2017 02:27 IST2017-05-08T02:27:48+5:302017-05-08T02:27:48+5:30

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, त्याचे नातेवाईक आणि गुंड साथीदारांना सरकारी यंत्रणांमधील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ आहे

Gwalbasi people along with the officers | ग्वालबन्सी टोळीला अधिकाऱ्यांची साथ

ग्वालबन्सी टोळीला अधिकाऱ्यांची साथ

मदतीसाठी धावपळ : पोलिसांकडून वेगळी यादी बनवणे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, त्याचे नातेवाईक आणि गुंड साथीदारांना सरकारी यंत्रणांमधील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ आहे. त्याचमुळे अनेक विभागाच्या जमिनी बळकावूनही ग्वालबन्सीच्या विरुद्ध तक्रार करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी अद्याप दाखविलेले नाही. हा भाग लक्षात घेता पोलीस विभागाने आता अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची अर्थात् ‘ग्वालबन्सी मित्रांची’ वेगळी यादी बनविणे सुरू केले आहे.
भूमाफिया ग्वालबन्सीचे जंगलराज उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस विभागाने धडक कारवाई हाती घेतली आहे. त्यामुळे ग्वालबन्सी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध आतापावेतो एकूण १५ गुन्हे दाखल झाले. त्यात दिलीप ग्वालबन्सी, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी आणि नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी व त्यांच्या काही नातेवाईकांचाही समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध तक्रारकर्त्यांची रोज गर्दी वाढत आहे. मात्र, ग्वालबन्सी टोळीने अनेक सरकारी जागांवर अतिक्रमण करून त्या हडपल्या आहेत. त्यासंबंधाने पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या कक्षात शुक्रवारी ५ मे रोजी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्यासह नासुप्रचे अधिकारी, महसूल, नगर भूमापन, वनविभाग, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक पार पडली. बैठकीत ग्वालबन्सीच्या जंगलराजला उद्ध्वस्त करून पीडितांना कसा न्याय देता येईल, यावर अधिकाऱ्यांनी विचारमंथन केले. भूमाफिया ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांनी शहरातील विविध विभागांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यांची आज घडीला किंमत २०० ते ३०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. या जमिनी मुक्त करण्यासाठी ज्या ज्या विभागाला पोलिसांची मदत पाहिजे त्यांना ती पुरविण्यात येईल, अशी ठोस भूमिका पोलीस आयुक्तांनी जाहीर केली होती. परंतु, एकाही विभागाच्या अधिकाऱ्याकडून अद्याप एकही तक्रार पोलिसांकडे आली नाही, त्यामुळे जनमानसात संतापवजा आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हा प्रकार लक्षात घेत पोलिसांनीही गोपनीय पद्धतीने ग्वालबन्सी टोळीशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची एक नवी यादी तयार करणे सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, ग्वालबन्सीच्या पापात सहभागी असलेल्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना आताही मदत करण्यासाठी धावपळ चालवली आहे. जरीपटक्यातील अप्पूच्या साथीदारांच्या मदतीने ही मंडळी वेगवेगळ्या वजनदार प्रस्थांकडे चकरा मारत आहेत.
त्याच्यावरही पोलिसांनी नजर रोखली आहे. काहींनी पोलिसांवरही वेगवेगळ्या पद्धतीने दडपण आणण्याचे प्रयत्न चालविले आहे. त्यामुळेच की काय, दिलीप आणि त्याच्या साथीदारानंतर पोलिसांनी अन्य आरोपींना अटक करण्यावर जोर देणे थांबवले आहे. या प्रकरणात सोमवारी, मंगळवारी काही महत्त्वाच्या घडामोडी अपेक्षित आहे.

मनसेतर्फे अभिनंदन
ग्वालबन्सीप्रमाणेच शहरातील अनेक गुंडांनी अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपून त्यांचे घरकुलाचे स्वप्न भंग करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या गुंडांना काही पोलिसांचीही साथ आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भ्रष्ट पोलीस आणि गुंडांची अभद्र युती तोडून मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरला सर्वात सुरक्षित शहर बनवावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. ग्वालबन्सीविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस पोलीस विभागाने दाखवले तर, लोकमतने हे प्रकरण बेधडकपणे लावून धरले. त्यामुळे पोलीस विभाग आणि लोकमतचे मनसेतर्फे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुकीत मतांची भीक मागण्यासाठी जनतेसमोर जावे लागते, ही बाब लक्षात ठेवून विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजकीय साटेलोटे तसेच स्वार्थ बाजूला ठेवून या जनहितार्थ कामात पुढे यावे, अशी सूचनाही गडकरी यांनी केली आहे.

 

Web Title: Gwalbasi people along with the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.