‘गुरुजी’ आध्यात्मिक साधनेचा आविष्कार
By Admin | Updated: December 2, 2014 00:32 IST2014-12-02T00:32:36+5:302014-12-02T00:32:36+5:30
पूज्यनीय गुरुजींचे जीवन त्यांच्या पुन:निर्मित वास्तूमध्ये अनुसरले गेले पाहिजे, तरच त्या वास्तूचे पुनर्निर्माण झाले असे म्हणता येईल. गुरुजी हे आध्यत्मिक साधनेचा प्रायोगिक आविष्कार होते.

‘गुरुजी’ आध्यात्मिक साधनेचा आविष्कार
मोहन भागवत : ‘ताई भाऊजी गोळवलकर’ स्मृतिभवनाचे लोकार्पण
रामटेक : पूज्यनीय गुरुजींचे जीवन त्यांच्या पुन:निर्मित वास्तूमध्ये अनुसरले गेले पाहिजे, तरच त्या वास्तूचे पुनर्निर्माण झाले असे म्हणता येईल. गुरुजी हे आध्यत्मिक साधनेचा प्रायोगिक आविष्कार होते. ते प्रकांड पंडित व नम्र होते. त्यांना प्राप्त झालेली दृढता ही विवेकाने प्राप्त झाली होती,असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व. माधव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या निवासस्थानाचे अर्थात ‘ताई भाऊजी गोळवलकर’ स्मृतिभवनाचे भारतीय उत्कर्ष मंडळ व स्वयंसेवकांच्या सहकार्याने नुकतेच पुनर्निर्माण करण्यात आले. या स्मृतिभवनाचे सोमवारी सायंकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर रामटेक येथील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आचार्य गोविंददेव गिरी महाराज, भय्याजी जोशी, संजय दाणी, अतुल मोहरीर, रामजी हरकरे आदींची मंचावर उपस्थिती होती.
भागवत म्हणाले, गुरुजींच्या भोवती स्नेहाचे वलय होते. ते सरसंघचालक असतानाही सर्वांना आपलेसे वाटायचे. ही कु टुंबवत्सलता व आत्मीयता केवळ त्यांच्यातच नव्हे तर तार्इंमध्येही ओतप्रोत भरलेली होती.
आपण कॅन्सरने पीडित असल्याचे माहीत असतानाही ते १८ तासांपेक्षा अधिक वेळ काम करायचे. तेवढाच प्रवासही करायचे. गुरुजींकडे पाहताना एका सतेज ऋषींचे दर्शन घडाचये. गुरुजींच्या निवासस्थानाचे पुनर्निर्माण करण्यात आले. ती वास्तू जीर्ण होऊ शकते. परंतु त्यातील विचार कधीही जीर्ण होऊ नये. या नवनिर्मित वास्तूमधून हजारो ‘गुुरुजी’ उदयाला यावेत. त्यांनी आजच्या पिढीला प्रेरणा द्यावी. देशनिर्माणाचे कार्य करावे, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.
यावेळी म्हणाले, श्री गुरुजींचे जीवन म्हणजे यज्ञकुुंड होय, असे सांगून आचार्च गोविंददेवजी यांनी गुरुजींच्या जीवनातील विविध पैलू उलगडून सांगितले. यावेळी वास्तु निर्माण करणाऱ्या वीरेंद्र देहाडराय, अभिजित आसोलकर, गुलाबराव घोरपडे, अभय तांबे, सुभाष रामटेके, जयराम सेलोकर आदींचा मोहन भागवत, आचार्य गोविंददेव व भय्याजी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व आभार जयंत मुलमुले यांनी मानले. उल्हास इटनकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला. संचालन मिलिंद चोपकर यांनी केले. चारूअपराजित यांनी पसायदान सादर केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने खा. कृपाल तुमाने, आ. डी. एम. रेड्डी, आ. अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष नीशा सावरकर, माजी आ. आशिष जयस्वाल, कांचन गडकरी, नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांच्यासह संघाचे पदाधिकारी व प्रचारक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)