पदवीधरांच्या निवडणुकीत गुरुजीच अधिक सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:51+5:302020-12-02T04:12:51+5:30
नागपूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रत्येक पदवीधारकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. पण यात शिक्षकांचा रोल सर्वात महत्त्वाचा आहे. ...

पदवीधरांच्या निवडणुकीत गुरुजीच अधिक सक्रिय
नागपूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रत्येक पदवीधारकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. पण यात शिक्षकांचा रोल सर्वात महत्त्वाचा आहे. निवडणुकीत मतदाराच्या नोंदणीपासून उमेदवाराच्या प्रचाराचाही केंद्रबिंदू शिक्षकच आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या टक्केवारीतही शिक्षण क्षेत्रातील मतदारांची टक्केवारी ९० टक्क्याहून अधिक आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या पाठीशी जास्तीत जास्त शिक्षक उभे असतील, तोच उमेदवार विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारापुढे परिषदेत मांडावयाच्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक प्रश्न शिक्षकांचे असतात. पदवीधरांचा बेरोजगारी हा प्रश्न सोडला तर उर्वरित विषय शिक्षकांच्या समस्यांच्या बाबतीत असतात. त्यामुळे शिक्षक मतदार संघाबरोबरच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका शिक्षकांसाठी महत्त्वाच्या असतात. मतदार संघात आता राजकीय पक्ष उमेदवार देत असले तरी, उमेदवारांच्या प्रचाराचा टार्गेट हा शिक्षकच असतो. यंदाच्या निवडणुकीत नवीन मतदार नोंदणी करण्यात आली. या मतदार नोंदणीत राजकीय पक्षाच्या पॅरेंट्स संघटनांपेक्षा सर्वाधिक आघाडीवर राजकीय पक्षांचे शिक्षक सेल आघाडीवर होते. शाळा, कॉलेजमध्ये मतदार नोंदणीचे कार्यक्रम चालले. उमेदवारांचा प्रचारही शाळा, कॉलेजमध्येच बघायला मिळाला. राजकीय पक्षानेही निवडणुकीची धुरा शिक्षक सेल, शिक्षक संघ यांच्यावरच सोपविली होती. मतदार नोंदणीपासून, मतदारांना घरातून काढण्यापर्यंतच्या कामात शिक्षकच अॅक्टिव्ह दिसले आणि मतदानातही शिक्षकांचीच आघाडी दिसून आली. त्यामुळे या निवडणुकीतील उमेदवाराचे भवितव्य शिक्षकांच्या भूमिकेवरून ठरणार आहे.
- मुळात पदवीधर मतदार संघ हा शिक्षकांच्या हक्काचा मतदार संघ आहे. आजपर्यंत या मतदार संघातून निवडून गेलेल्या आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडताना शिक्षकांच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली आहे. निवडणुकीत एकगठ्ठा मतदार हे शाळा कॉलेजमध्येच असतात. त्यामुळे या निवडणुकीचा खरा फोकस शिक्षकच राहिला आहे.
अनिल शिवणकर, शिक्षक
- पदवीधर मतदार संघाचा मतदार हा पदवीधर असला तरी, पदवीधरांच्या समस्या मर्यादित आहेत. तुलनेत शिक्षकांच्या समस्या अमर्याद आहेत. त्यामुळे शिक्षकांनाच हा मतदार संघ आपल्या हक्काचा वाटत असल्याने शिक्षक खूप अॅक्टिव्हपणे काम करतात.
डॉ. जयंत जांभुळकर, शिक्षक
- इतर क्षेत्रात विखुरलेले पदवीधर ही निवडणूक गंभीरतेने घेत नाहीत. निवडणुकीत एकूण होणाऱ्या मतदानाची आकडेवारी लक्षात घेता ८० टक्के शिक्षकांचे मतदान असते. त्यामुळे शिक्षकच खऱ्या अर्थाने या निवडणुकीतील उमेदवारांचा तारणहार असतो.
योगेश बन, सेवानिवृत्त शिक्षक