पांढऱ्याशुभ्र नाजूक हलव्याच्या लॅपटॉपसह गिटार, स्टेथॅस्कोप आणि बरंच काही.... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 10:42 IST2018-01-13T10:36:43+5:302018-01-13T10:42:32+5:30
धरमपेठ भागात असलेल्या माता मंदिरात माहेर महिला मंडळाच्या फक्त चार सदस्यांनी १९९३ साली हा उपक्रम सुरू केला. प्रारंभी हौस म्हणून सुरू केलेला हा प्रयोग पुढे अव्याहत सुरू असणारा आणि देशविदेशात नावाजला गेलेला यशस्वी उद्योग बनला.

पांढऱ्याशुभ्र नाजूक हलव्याच्या लॅपटॉपसह गिटार, स्टेथॅस्कोप आणि बरंच काही.... !
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लॅपटॉप, गिटार, स्टेथॅस्कोप किंवा विमान या वस्तूंचा मकरसंक्रांतीशी काही संबंध असेल असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. पण जेव्हा या आणि यांच्यासह तुम्हाला ज्या ज्या हव्याशा वाटतील त्या त्या सर्व वस्तू अतिशय बारीक, नाजूक व पांढऱ्याशुभ्र हलव्याने बनवलेल्या जेव्हा समोर येतात तेव्हा मन थक्क होऊन जाते. ही किमया साधली आहे नागपुरातील मोहक आर्टस्च्या २५ कलावंतांना.
धरमपेठ भागात असलेल्या माता मंदिरात माहेर महिला मंडळाच्या फक्त चार सदस्यांनी १९९३ साली हा उपक्रम सुरू केला. प्रारंभी हौस म्हणून सुरू केलेला हा प्रयोग पुढे अव्याहत सुरू असणारा आणि देशविदेशात नावाजला गेलेला यशस्वी उद्योग बनला. मोहक आर्टस् या नावाने सुरू असलेला हा व्यवसाय त्याच्या संस्थापक सदस्य सौ. सुरेखा देशपांडे यांच्यासह सध्या २५ स्त्रिया चालवीत आहेत.
मकरसंक्रांतीला लागणारे पारंपारिक दागिने तर येथे अतिशय कलात्मकरित्या बनवले जातातच. शिवाय ज्यांची जशी मागणी असेल तशा वस्तू आम्ही बनवूनही देतो असे सुरेखा देशपांडे यांचे सांगणे आहे. एकदा एक सूनबाई मेडिकल फील्डच्या होत्या, त्यांच्या सासूबाईंच्या आग्रहाखातर आम्ही हलव्याचा स्टेथॅस्कोप बनवून दिला. एका जावयाला गिटारची आवड होती तर त्यांच्यासाठी हलव्याची गिटार बनवली होती. यंदा एका टेक्नोसॅव्ही लेकीसाठी लॅपटॉप बनविला आहे. याखेरीज तबला डग्गा, हार्मोनियम यांचीही मागणी असतेच.
दागिने हलव्याचे असो वा सोन्याचांदीचे, त्यावर तत्कालीन सिरीयल्स व सिनेमातील फॅशनचा मोठा प्रभाव असतो. तो येथेही पहायला मिळतो. यंदा पद्मावती किंवा म्हाळसा हाराला जास्त मागणी आहे. तसेच जान्हवी मंगळसूत्रही आवर्जून बनवण्यास सांगितले जाते.
येथे बनवल्या जाणाऱ्या दागिन्यांसाठी लागणारा हलवा याच मंडळातील एक सदस्य बनवतात. त्यांना एका सीझनला किमान दिडशे ते दोनशे किलो हलवा लागतो. त्यात खसखशीच्या दाण्यावर बनलेला नाजूकसा हलवा सर्वात जास्त लागतो. बाकी तीळ, तांदूळ व साबुदाण्यावरचाही हलवा येथील दागिन्यांवर पहायला मिळतो.
आम्ही आॅगस्टपासूनच हलव्याचे दागिने बनवण्यास सुरुवात करतो. कारण दिवाळसणासाठी परदेशातून लेक, सुना, जावई व मुली येणार असतात. त्यांना हे दागिने सोबतच न्यायचे असतात. त्यामुळे बहुतेक वेळेस आमचे दागिने दिवाळीतच तयार असतात. हलव्याच्या या सर्व दागिन्यांची किंमत 100 ते 800 रुपयांच्या दरम्यान आहे.
संक्रांतीच्या दागिन्यांव्यतिरिक्त मोहक आर्टस्मध्ये वर्षभर रुखवत, फुलांच्या रांगोळ्या, लग्नाची आरास, डोहाळजेवण, बारसं याच्या सजावटीचीही कामे केली जातात. मंडळाच्या कल्याणी भूत, साधना पांडे, मीनाक्षी करंडे यांच्यासह अन्य दिवसरात्र येथे आपल्या कलात्मकतेला मेहनतीची जोड देऊन उत्तमोत्तम वस्तू बनवण्यात गर्क असतात. दुपारी १ ते रात्री ९ पर्यंतची ही कलासाधना त्या सर्वांच्या आयुष्याला जो हलव्याचा गोडवा देऊन जात असते त्याचे कौतुक व सार्थ अभिमान या सर्वांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो.