लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात महिला व विशेषतः अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे सत्रच सुरू आहे. गिटार शिकविण्याच्या नावाखाली एका नराधम क्लासचालकाने कहर करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्याने बंदुकीचा धाक दाखवून तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली व सातत्याने अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
सागर सिंग परोसिया ऊर्फ सॅमसंग (२७, सिव्हिल लाइन्स) आहे. तो असे आरोपीचे नाव उज्ज्वलनगर येथील सनशाइन अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर रॉकस्टार अकॅडमी नावाने गिटारचे क्लासेस चालवितो. पीडित अल्पवयीन मुलीला गिटार शिकायची होती. त्यामुळे तिने जून महिन्यात त्याच्याकडे क्लास लावला. सुरुवातीला आरोपी अल्पवयीन मुलीशी चांगल्यानेच वागला. मात्र त्यानंतर एके दिवशी त्याने तिला क्लासच्या कोपऱ्यात नेले व तिच्याशी अश्लील चाळे करत घाणेरडे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ही बाब खटकल्याने मुलीने
तिथेच गिटार सोडली व ती क्लासमधून निघून गेली. २३ जुलै रोजी आरोपी सागरने तिला फोन केला व दहा मिनिटांत भेटायला आली नाही तर घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. घाबरलेली मुलगी क्लासमध्ये गेली असता आरोपीने त्याच्याजवळील बंदूक व चाकूच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार तिला जिवे मारण्याची भीती दाखवत क्लासच्या फ्लॅटवर बोलविले व अत्याचार केला. दि. २३ जुलै ते १२ ऑगस्ट हा प्रकार सुरू होता. त्याने यादरम्यान अनेकदा तिच्या आईवडिलांना बंदुकीने ठार मारेन, अशी तिला धमकी दिली. मात्र त्याचा त्रास असह्य झाल्याने अखेर मुलीने कुटुंबीयांना आपबिती सांगितली. ते तिला सोनेगाव पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तिथे तिच्या तक्रारीवरून आरोपी सागरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.