मोहाफुलांच्या संकलनासाठी आता ग्रीन नेट : वनविभागाचा नवा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:52 IST2020-04-23T00:51:19+5:302020-04-23T00:52:57+5:30
उन्हाळा आला की मोहाफुलांच्या संकलनाची लगबग सुरू होते. अनेक आदिवासींसाठी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र या काळात जंगलांना आगीही लागतात. हे टाळण्यासाठी आणि जैव विविधतेच्या रक्षणासाठी मोहाफुले वेचण्यासाठी आणि संकलनासाठी ग्रीन नेटचा वापर केला जात आहे.

मोहाफुलांच्या संकलनासाठी आता ग्रीन नेट : वनविभागाचा नवा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळा आला की मोहाफुलांच्या संकलनाची लगबग सुरू होते. अनेक आदिवासींसाठी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र या काळात जंगलांना आगीही लागतात. हे टाळण्यासाठी आणि जैव विविधतेच्या रक्षणासाठी मोहाफुले वेचण्यासाठी आणि संकलनासाठी ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. नागपूरवनविभागाच्या कार्यक्षेत्रातील काही वनपरिक्षेत्रामध्ये प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नागपूर वनविभागात दीड लाख हेक्टर जंगलाच्या भागात जवळपास ५३३ गावे आहेत. विदर्भातील अनेक गावांसाठीही जंगल हे उपजीविकेचे साधन आहे. मोहाफुलांच्या काळात जंगलांना आगी लागण्याच्या घटना अधिक घडतात. त्या टाळण्यासाठी व जंगलाच्या रक्षणाच्या हेतूने ही संकल्पना प्रायोगिक स्तरावर अस्तित्वात आणली आहे. यानुसार, मोहफुल असलेल्या झाडाखाली ग्रीन नेट बांधायची, झाडावरून पडणारी मोहाफुले त्या ग्रीन नेटमध्ये पडतील, दुसऱ्या दिवशी सकाळी अवघ्या १५ मिनिटात फुले गोळा करून जाता येईल.
अनेक धोके टळणार
यामुळे अनेक धोके टळू शकतात. पडलेली मोहाफुलें पालपाचोळ्यातून वेचायला लागणारा वेळ वाचणार आहे. मोहाफुलासाठी लावल्या जाणाºया आगीच्या घटना टळणार आहेत. जमिनीवर पडलेली मोहाफुले प्राणी खायचे थांबणार. महत्त्वाचा टळणारा धोका म्हणजे, मोहाफुले वेचण्यासाठी तासन्तास झुकावे लागायचे. व्यक्तीवर वाघाचे हल्ले व्हायचे. या प्रक्रियेत लोकांचा जीव थोडाफार सुरक्षित झाला आहे.
या नाविन्यपूर्ण पध्दतीचे फायदे लक्षात आले आहेत. त्यामुळे यापुढे दरवर्षी याच पध्दतीने संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत बचत गटांना व गावकऱ्यांना ग्रीन नेट पध्दतीची जनजागृती करुन हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे.
डॉ. प्रभूनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर