Great relief; Decrease in positive patients despite increase in tests in Vidarbha | मोठा दिलासा; विदर्भात चाचण्या वाढल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णात घट

मोठा दिलासा; विदर्भात चाचण्या वाढल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णात घट

ठळक मुद्दे१४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत ६.६५ टक्के कोरोनाबाधितांची नोंद

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळीपूर्वी कमी झालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा हा दर फारच कमी आहे. नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, बुलडाणा व गोंदिया या आठ जिल्ह्यात १ ते १३ नोव्हेंबरपर्यंत १०१४४३ चाचण्या झाल्या. यातून ८६८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. याचा दर ८.५५ टक्के होता. तर १४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत १६०३३७ चाचण्या झाल्या. यातून १०६७६ रुग्ण बाधित आढळून आले. याचा दर मागील ६.६५ टक्के असून तो १.९० टक्क्याने कमी आहे. आरोग्य यंत्रणेसाठी हा मोठा दिलासा आहे.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा वेग कमालीचा वाढला. या दोन महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागली. दिवाळीपूर्वी तर पहिल्यांदाच रुग्णसंख्या ५००च्या खाली होती. मृतांच्या संख्येतही घट येऊन ती २५ खाली गेली होती. परंतु दिवाळीच्या काळात सर्वत्र झालेल्या गर्दीने दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दिवाळीनंतरच्या १२ दिवसात रुग्णसंख्येत वाढही झाली. परंतु ही वाढ वाढलेल्या चाचण्यांच्या तुलनेत फार कमी असल्याचे सामोर आले. वाढलेली रुग्णसंख्या ही कोरोनाची दुसरी लाट नसल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

- दिवाळीपूर्वी १०१४४३ चाचण्या, नंतर १६०३३७ चाचण्या

दिवाळीपूर्वीच्या १२ दिवसात म्हणजे, १ ते १३ नोव्हेंबर या दरम्यान नागपुरात ५६५९७, अकोल्यात १३४१, अमरावतीत ५२६२, चंद्रपुरात ८६८३, यवतमाळात ४४६९, गडचिरोलीत ४८०२, बुलडाण्यात १२४३० तर गोंदियात ७८५९अशा एकूण १०१४४३ झाल्या. तर, दिवाळीनंतरच्या १४ ते २६ या १२ दिवसात नागपुरात ७००५६, अकोल्यात ८७९४, अमरावतीत १५७३३, चंद्रपुरात १६८३३, यवतमाळात १३१७५, गडचिरोलीत ९४५८, बुलडाण्यात १३१९७ तर गोंदियात १३०९१ अशा एकूण १६०३३७ झाल्या. मागील १२ दिवसांच्या तुलनेत ६३.२६ टक्क्याने चाचण्यांची संख्या वाढली.

 

 

Web Title: Great relief; Decrease in positive patients despite increase in tests in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.