अनुदान लांबले आणि घरकुल थांबले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:48+5:302021-06-09T04:10:48+5:30
शरद मिरे भिवापूर : कागदी घोड्यांची पूर्तता केल्याच्या तब्बल दोन वर्षानंतर घरकुल मंजूर झाले. लागलीच अनेकांनी घरकुल उभारण्याचे काम ...

अनुदान लांबले आणि घरकुल थांबले!
शरद मिरे
भिवापूर : कागदी घोड्यांची पूर्तता केल्याच्या तब्बल दोन वर्षानंतर घरकुल मंजूर झाले. लागलीच अनेकांनी घरकुल उभारण्याचे काम सुरू केले. पहिला टप्प्यातील रक्कम मिळाली. मात्र दुसऱ्या टप्प्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या घरकुलाची कामे अर्ध्यावर येऊन थांबली आहेत. अनुदान मिळण्याचा कालावधी लांबल्यामुळे भिवापुरातील १८२ लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. स्वत:ची जागा असली तरी हक्काचे छत नसलेल्या नागरिकांना पक्के घरकुल बांधकामासाठी शासनाकडून २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिल्या जात आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी शहरातील अनेकांनी नगर पंचायतीकडे अर्ज केले आहेत. दरम्यान, यातील ६६ जणांना मार्च २०१९ मध्ये तर ११६ जणांना जुलै २०१९ मध्ये घरकुल मंजूर झाले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत संबंधित लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात केली. यासाठी अनेकांनी आपली जुनी कच्ची घरे पाडली. मंजूर झालेल्या घरकुल बांधकामासाठी शासनाकडून दोन टप्प्यात ही रक्कम लाभार्थ्यांना मिळणार होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रति लाभार्थी एक लाख रुपये याप्रमाणे शासनाकडून नगर पंचायतीला अनुदानाची रक्कम प्राप्त होताच, ती लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. अनुदानाच्या एक लाख रुपयात अनेकांच्या घरकुलाची कामे सज्जा लेव्हलपर्यंत आली. मात्र त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मिळणारे १.५० लाख रुपयाचे अनुदान अद्यापही नगर पंचायतीला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अनेकांच्या घरकुलाची कामे अर्ध्यावर येऊन थांबलेली आहेत. लांबलेले अनुदान कधी मिळणार, हे विचारण्यासाठी दररोज कित्येक लाभार्थी नगर पंचायतीच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. यासंदर्भात नगर पंचायतीचे घरकुल बांधकाम अभियंता सौरभ तोंडे (सीएलटीसी) यांच्याशी संपर्क साधला असता, शासनाकडून मंजूर घरकुलासाठी आलेल्या पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र दुसरा टप्प्याचे अनुदान अद्याप आलेले नाही. ते येताच लाभार्थ्यांच्या खात्यावर विनाविलंब जमा करण्यात येईल, असे सांगितले.
उधारवाड करून घरकुल पूर्ण
अनुदानाचा दुसरा टप्पा लांबल्याने घरकुलाचे काम अर्ध्यावर थांबले आहे. बांधकामासाठी खरेदी केलेले सिमेंट, लोखंड आदीचे पैसे देणे बाकी आहे. घरकुल बांधणारे कंत्राटदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे अनुदान आज ना उद्या मिळेल या आशेने अनेकांनी उधारवाड करून घरकुल पूर्ण केले आहे. मात्र वर्ष-दोन वर्ष उलटूनही पूर्ण अनुदान मिळाले नसल्याने घरकुल पूर्ण करणारे लाभार्थीसुद्धा उधारवाडीमुळे कैचीत सापडले आहेत.
--
२०१९-२० मध्ये घरकुल योजनेच्या पहिल्याच यादीत माझे नाव होते. त्यामुळे अनुदानाची पूर्ण रक्कम दोन-चार महिन्यात मिळेल, या आशेने उधारवाड घेऊन घरकुल बांधकाम सुरू केले. बांधकाम बहुतांश पूर्ण झाल्यानंतर आता कुठे महिनाभरापूर्वी पहिल्या टप्प्याचे अनुदान मिळाले. दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळणे बाकीच आहे. अशा लेटलतीफ कारभारामुळे माझ्याप्रमाणे असंख्य लाभार्थी अडचणीत आले आहेत.
- रमेश भजभुजे, भिवापूर
===Photopath===
070621\img_20160528_153931.jpg
===Caption===
भिवापूर नगरपंचायत कार्यालय