शेतकऱ्यांच्या वेदनांचे महापर्णचित्र
By Admin | Updated: September 7, 2014 00:54 IST2014-09-07T00:54:12+5:302014-09-07T00:54:12+5:30
वाळलेली पिंपळाची पाने लहानपणी आपण आपल्या पुस्तकात जपून ठेवायचो. पुस्तकाच्या दबावाने त्या वाळलेल्या पानांच्या शिरा स्पष्टपणे दिसायच्या आणि वाळलेल्या पानाचेही सौंदर्य मनाला भुरळ घालायचे.

शेतकऱ्यांच्या वेदनांचे महापर्णचित्र
नागपूर : वाळलेली पिंपळाची पाने लहानपणी आपण आपल्या पुस्तकात जपून ठेवायचो. पुस्तकाच्या दबावाने त्या वाळलेल्या पानांच्या शिरा स्पष्टपणे दिसायच्या आणि वाळलेल्या पानाचेही सौंदर्य मनाला भुरळ घालायचे. ते पान अनेकांना आयुष्यभर पुस्तकातून काढून टाकता आले नाही. हिरव्या पानांचा टवटवीतपणा खुणावतो तसेच वाळलेल्या पानांचे सौंदर्यही वेड लावणारेच असते.
विविध वृक्षांच्या वाळलेल्या पानांतून उत्कृष्ट रंगसंगती साधत आशयघन चित्र निर्माण झाले तर...कृत्रिम रंगाचा उपयोग नाही वा ब्रशचा फटकाराही नाही. सुभाष तुलसीता या चित्रकाराने केवळ निसर्गातील शुष्क पानांच्या उपयोगातून आतापर्यंत अनेक चित्र साकारली. आज मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना, प्रश्न मांडताना महापर्णचित्र साकारले.
पाऊस...वादळी वारा...थंडी होती. सकाळी ११ वाजतापासून या पर्णचित्राला चिटणवीस सेंटरच्या हिरवळीवर प्रारंभ करण्यात आला. धाग्याने एका महाकाय पानाची आकृती तयार करण्यात आली आणि कामाला प्रारंभ झाला. पण अचानक पावसाला सुरुवात झाली, तरीही सुभाष तुलसीता आणि चमूचे काम सुरू होते. पण मुसळधार पाऊस कोसळल्यावर मात्र चित्र साकारणे शक्य झाले नाही. पावसाने या चित्रकारांच्या उत्साहात अधिक भर पडली. साधारण पाच तास आणि दोन हजारापेक्षा अधिक वाळलेल्या पानांच्या साह्याने हे विशाल पान साकारण्यात आले.
विशाल पानाचे चित्र तयार झाल्यावर सुभाष तुलसीता आणि अलग अँगलच्या चमूने जल्लोष करून आनंद व्यक्त केला. ज्या संकल्पनेवर हे चित्र साकारण्यात आले ती संकल्पना ‘आय हॅव अ ड्रीम’ होती. साकारण्यात आलेल्या पानात वाळलेल्या पानांच्या साह्यानेच ‘आय हॅव अ ड्रीम’ असे कलात्मकतेने लिहिण्यात आले आहे.
जागतिक विक्रम करणारे चित्र
अशा पद्धतीची विक्रमी चित्रे जगात काही देशांत काढण्यात आली आहेत पण हिरवळीवर साकारलेले हे जगातील सर्वात पहिले पर्णचित्र आहे. लिम्का आणि वर्ल्ड रेकार्डसाठी हा उपक्रम नव्हता पण जागतिक स्तरावर याची नोंद घेतल्या जात असेल तर तसा प्रयत्न करण्यात येईल, असे तुलसीता यांनी सांगितले.
‘फार्मर्स डे’ असावा
शेतकऱ्यांकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आपला अन्नदाता असूनही तोच उपेक्षित आहे. दिवाळीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या चार आत्महत्या घडल्या, या घटनेने आपण व्यथित झालो. अनेक डे असतात तसा ‘फार्मर डे’ असावा म्हणून लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे व नव्या कलावंतांचेही लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम राबविला, असे सुभाष तुलसीता म्हणाले. (प्रतिनिधी)