सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर मनपाची कृपा
By Admin | Updated: January 21, 2015 00:20 IST2015-01-21T00:20:47+5:302015-01-21T00:20:47+5:30
तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांनी सक्तीची सेवानिवृत्ती दिलेल्या व गैरव्यवहाराचे आरोप असलेले वाहतूक अधिकारी नसीर खान यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालिकेच्या

सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर मनपाची कृपा
सभागृहात निर्णय : नसीर खान यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव
नागपूर : तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांनी सक्तीची सेवानिवृत्ती दिलेल्या व गैरव्यवहाराचे आरोप असलेले वाहतूक अधिकारी नसीर खान यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर कृपा कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खान यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा प्रस्ताव सदस्यांनी दिला होता. महापौरांनी हा प्रस्ताव पुकारल्यानंतर सत्तापक्ष वा विरोधी सदस्यांनी यावर आक्षेप न घेतल्याने चर्चा न होताच मंजुरी देण्यात आली. दुसरीकडे राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेले शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्याजागी अशोक टालाटुले यांना पदोन्नती देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. वास्तविक टालाटुले यांना अनियमिततेच्या कारणावरून शिक्षणाधिकारी या पदावरून हटविण्यात आले होते. आता ज्येष्ठतेचा आधार घेत त्यांना पुन्हा याच पदावर आणले जात आहे.
खान यांनी मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमवणे व वयाची चुकीची माहिती दिली होती. याची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. चौकशीनंतर त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले होते. खान यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव माजी उपमहापौर जैतुन्नबी अशफाक अहमद ,भूषण शिंगणे, संजयकुमार बालपांडे, प्रकाश तोतवानी, कामील अन्सारी , असलम खान, सविता सांगोळे आदिंनी नोटीस देऊ न मांडला होता. (प्रतिनिधी)
प्रकरण न्यायालयात असताना मंजुरी?
यापूवीर्ही अनेकदा न्यायप्रविष्ट प्रकरणे सभागृहात चर्चेसाठी आलेली आहेत. परंतु त्यावर सभागृहात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही वा मंजुरी दिलेली नाही. परंतु नसीर खान यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सभागृहात चर्चा न करता त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र टीडीआरसह अन्य न्यायप्रविष्ट प्रकरणात सभागृहात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.