नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला लवकरच नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. नियुक्तीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात ३० उमेदवारांनी सादरीकरण केले असून त्यामधून निवड समिती पाच उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात राज्यपाल कार्यालयात पाठवणार आहे. राज्यपालांच्या मुलाखतीनंतर एका नावावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नाेव्हेंबर महिन्यात कुलगुरुंची घाेषणा हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठात जवळपास दीड वर्षांपासून कुलगुरूची जबाबदारी प्रभारींकडे आहे. सुरुवातीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोड़े-चवरे या कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम हाेताे आहे. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार कार्यरत असले तरी नीतिगत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने विकासकामे रखडली आहेत. नवीन कुलगुरू नियुक्त झाल्यानंतरच विद्यापीठाच्या विकासाची गाडी पुन्हा रुळावर येऊ शकेल.
अलिकडेच कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ७० पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ३० जणांची निवड करून त्यांना सादरीकरणास बोलावण्यात आले. सर्वांनी आपापले प्रेझेंटेशन दिले. आता या ३० पैकी ५ उमेदवारांची निवड करून त्यांची नावे बंद लिफाफ्यात राज्यपाल कार्यालयात पाठवली जाणार आहेत. राज्यपाल मुलाखत घेऊन एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. सध्या उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता असून टॉप फायव्हमध्ये येण्यासाठी सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
या वेळी एका विशिष्ट संघटनेतील स्पर्धा तीव्र असल्याचे मानले जात आहे. भाजप समर्थित शिक्षण मंच सक्रिय झाले आहे. विद्यापीठात ६९ प्राध्यापकांच्या नियुक्त्या होणार असल्याने भविष्यातील समीकरणे लक्षात घेऊन कुलगुरूंची निवड होणार असल्याचे म्हटले जात आहे. गुणवत्तेबरोबरच ‘पॉलिटिकल अॅप्रोच’ असलेल्या उमेदवारालाच या पदावर बसण्याची संधी मिळू शकते. कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर चारही संकुलांचे अधिष्ठाता तसेच नवीन प्र-कुलगुरूंचीही नियुक्ती केली जाणार आहे.