शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारची डोळेझाक - राहुल गांधी
By Admin | Updated: April 30, 2015 16:52 IST2015-04-30T16:06:06+5:302015-04-30T16:52:47+5:30
शेतक-यांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, मात्र सरकार त्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारची डोळेझाक - राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
तोंगलाबाद, दि. ३० - शेतक-यांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, मात्र सरकार त्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रणरणत्या उन्हात अमरावतीतील गुंजी ते रामगावपर्यंत १५ किमीची पदयात्रा करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यानंतर तोलंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. 'मी यापूर्वीही विदर्भात येऊन गेलो, मात्र आजच्या इतकी भयानक परिस्थिती मी पाहिली नव्हती' असे ते म्हणाले. 'कर्जाच्या ओझ्याने पिचलेले अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना काही मंत्री मात्र तीनच शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा दावा करतात तर काही जण त्या शेतक-यांची भेकड म्हणून अवहलेना करतात' असे सांगत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार शेतकरी वा मजुरांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
यावेळी त्यांनी शेतक-यांना धीर न सोडण्याचे आवाहन केले. या लढाईत काँग्रेस शेतक-यांच्या पाठीशी असून पक्षाकडून शेतक-यांना शक्य तितकी मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.