बारमध्ये घोट घेत 'शासकीय सह्या'; अभियंता निलंबित; आदेशात 'लोकमत'चा उल्लेख

By सुमेध वाघमार | Updated: July 30, 2025 12:43 IST2025-07-30T12:43:07+5:302025-07-30T12:43:48+5:30

Nagpur : बारमधील सीसीटीव्हीच्या फुटेजमधून घेतला शोध

'Government signatures' taken in a bar; Engineer suspended; 'Lokmat' mentioned in the order | बारमध्ये घोट घेत 'शासकीय सह्या'; अभियंता निलंबित; आदेशात 'लोकमत'चा उल्लेख

'Government signatures' taken in a bar; Engineer suspended; 'Lokmat' mentioned in the order

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
उपराजधानीतील मनीषनगरात एका बारमध्ये मद्याचा घोट घेत महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याचे प्रकरण 'लोकमत' ने चव्हाट्यावर आणले होते. यात गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार्मोशी उपविभागातील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के असल्याचे स्पष्ट होताच शासनाने मंगळवारी सोनटक्केवर तातडीने निलंबनाची कारवाई केली. सोबतच सोनटक्केसह कंत्राटदाराचे प्रतिनिधी राहुल झोडे, लोकेश डोंगरवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचेही आदेश काढण्यात आले.


मनीषनगर भागातील कीर्ती बारमध्ये तीन व्यक्ती महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईल्सचा गठ्ठा घेऊन बसले होते. त्यापैकी एक त्या फायलीवर स्वाक्षरी करत होता. शासनाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या या गंभीर प्रकाराची दखल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेऊन त्यांनी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना चौकशीचे आदेश दिले.


बारमधील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या साहाय्याने या अधिकाऱ्याचा शोध घेण्यात आला. मद्याचा घोट घेत फायलींवर स्वाक्षरी करणारे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोनटक्के यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई म्हणून तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव मेघश्याम नवार यांनी काढले.


शासकीय दस्तावेज कार्यालयाच्या बाहेर नेल्यामुळे सोनटक्केसह कंत्राटदार प्रतिनिधी राहुल झोडे व लोकेश डोंगरवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी अ. अ. मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूरच्या मुख्य अभियंत्याला दिले.


सोनटक्के यांची कारकीर्द वादग्रस्त
देवानंद सोनटक्के यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. यापूर्वी ते सिरोंचा उपविभागात होते. सिरोंचा तालुक्यातून गेलेल्या निजामाबाद-जगदलपूर या आंतरराज्य महामार्गावरील वडधमजवळच्या पुलाजवळ संरक्षक भिंत पावसाच्या पाण्याने २५ जुलै रोजी खचली होती. या संरक्षक भिंतीचे काम सोनटक्के यांच्या कार्यकाळातच झाल्याची चर्चा आहे. कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देऊनही या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड आहे. महिनाभरापूर्वी सोनटक्केंची चामोर्शी येथे बदली झाली. तत्पूर्वी ते नागपूर येथे कार्यरत असताना एका प्रकरणात त्यांची चौकशी देखील सुरु असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.


मुख्य अभियंता 'नॉट रिचेबल'
प्रशासनाने हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांना अहवाल तयार करावा लागणार आहे. मात्र ते ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात मंगळवारीदेखील बेलतरोडी पोलीस ठाण्यात कुणीही तक्रार केलेली नाही. सरकारी अधिकारी गुंतला असल्याने जोपर्यंत या प्रकरणात तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलीसदेखील सखोल चौकशी करू शकणार नाहीत. या प्रकरणात संबंधितांवर पोलीस तक्रार करायची असेल तर त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र नंदनवार यांचे अखेरचे दोन दिवस असल्याने आता ही परवानगी कुणाकडून मिळणार व तक्रार कधी होणार, हा सवाल कायम आहे. 'लोकमत'ने नंदनवार यांना अनेकदा संपर्क केला. मात्र ते 'नॉट रिचेबल' होते.


शासकीय कामकाजाची गोपनीयता आणि नियमांनुसार कामकाज करण्याची अपेक्षा असताना, अशा प्रकारे उघडपणे फायलींवर सह्या होणं निश्चितच गंभीर असून 'ते' अधिकारी कोण?, असा प्रश्न उपस्थित करणारे वृत्त 'लोकमत'ने २८ जुलै रोजी 'बीअर बारमध्ये 'शासन' सुरू। दारूचे घोट घेत फायलींवर सह्या' या मथळ्याखाली प्रकाशित केले.

Web Title: 'Government signatures' taken in a bar; Engineer suspended; 'Lokmat' mentioned in the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर