शासनाने लठ्ठपणावर मोफत उपचार उपलब्ध करावेत
By Admin | Updated: June 20, 2016 02:41 IST2016-06-20T02:41:17+5:302016-06-20T02:41:17+5:30
लठ्ठपणा हा गंभीर आजार असून शासनाने अशा रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन लोकमतच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले.

शासनाने लठ्ठपणावर मोफत उपचार उपलब्ध करावेत
विजय दर्डा यांचे आवाहन : ‘द इट-राईट प्रीस्क्रिप्शन’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : लठ्ठपणा हा गंभीर आजार असून शासनाने अशा रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन लोकमतच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले.
देशातील प्रसिद्ध बॅरियाट्रिक सर्जन डॉ. मुफज्जल लाकडावाला यांनी लिहिलेल्या ‘द इट-राईट प्रीस्क्रिप्शन’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम सिव्हिल लाईन्सस्थित क्रॉसवर्ड येथे पार पडला. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत व अनिल देशमुख हे अन्य प्रमुख अतिथी होते.
लठ्ठपणा आजारावर चिंता व्यक्त करून खासदार दर्डा म्हणाले, शासनाने लठ्ठपणावरील उपचाराचा अद्याप कोणत्याही योजनेत समावेश केलेला नाही. बदललेल्या जीवनशैलीमुळे हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आजार दिसून येत आहे. अनेक गरजू रुग्णांना यावर खासगी रुग्णालयात उपचार करणे शक्य होत नाही. परिणामी केंद्र व राज्य शासनाने लठ्ठपणावर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
दर्डा यांनी डॉ. लाकडावाला यांची प्रशंसा करून त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वजन कमी केल्याचे सांगितले. डॉ. लाकडावाला यांनी पुस्तकात आहाराचे महत्त्व सांगितले आहे. नागरिकांनी यातील सूचनांचे पालन केल्यास लठ्ठपणाला सहज दूर ठेवता येऊ शकते. परंतु, याहीपेक्षा आणखी एक गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे, लठ्ठपणावरील उपचार विम्याच्या सीमेत आले पाहिजेत. अमेरिका व ब्राझीलमध्ये ही सुविधा आहे, अशी माहिती दर्डा यांनी दिली.
दर्डा पुढे म्हणाले, डॉ. लाकडावाला नागपुरात आले याबद्दल त्यांचा आभारी आहे. ते केवळ नागपूर, मुंबई, दिल्ली व संपूर्ण देशातच नाही तर, संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. ते डॉक्टरांमधील खरे रॉबिनहुड आहेत. गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी अनेकदा स्वत:चे पैसे खर्च केले आहेत. तसेच, असंख्य रुग्णांवर कमी खर्चात उपचार केले आहेत. असे समाजहिताचे कार्य करण्याची त्यांना शुभचिंतकांकडून सतत शक्ती मिळत राहील.
डॉ. लाकडावाला यांनी सहलेखिका कार्लाईन रेमेडिओस यांच्यासह लिहिलेले हे पुस्तक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचनांनी परिपूर्ण आहे. या सूचना सर्वांना सुदृढ ठेवण्यासाठी उपयोगी सिद्ध होतील, असा ठाम विश्वास आहे. डॉ. लाकडावाला यांनी हे पुस्तक हिंदी, मराठी व गुजरातीमध्ये भाषांतरित करावे, अशी विनंती दर्डा यांनी यावेळी केली.
राऊत यांनी अन्य नेत्यांसह आपणही डॉ. लाकडावाला यांच्याकडे लठ्ठपणावर शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली. अन्य नेत्यांमध्ये नितीन गडकरी, विनोद तावडे, वेंंकय्या नायडू, नवाब मलिक आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शस्त्रक्रियेमुळे सगळ्यांचे वजन कमी झाल्याने ते आता जनतेची कामे चांगल्या पद्धतीने करू शकत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशमुख यांनी डॉ. लाकडावाला यांचे पुस्तकातील अनुभव प्रत्येकासाठी उपयोगाचे आहेत, असे मत व्यक्त केले. नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी पुस्तकात दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लठ्ठपणा अत्यंत घातक आजार आहे. या आजाराला स्वत:पासून कसे दूर ठेवता येईल याचा सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. लाकडावाला यांनी लठ्ठपणासंदर्भात विचार मांडले. निरोगी राहण्यासाठी आहार व व्यायामावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हे करणारी व्यक्ती १० ते १५ वर्षे अधिक जगू शकते. आहार व व्यायाम निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे कुणालाही लठ्ठपणा येऊ शकतो. लठ्ठपणामुळे अन्य विविध आजार जडण्याची शक्यता असते. आपण सुदृढ आहोत, असा विचार करणाऱ्या एकाही व्यक्तीला आतापर्यंत भेटलो नाही. यात ‘साईज झिरो’ असलेल्या अभिनेत्री व महिलांचाही समावेश आहे. शरीराला वळणदार ठेवण्याची इच्छा सतत वाढत जाते. यामुळे वजन कमी करण्याचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. सुदृढ शरीर असलेल्या व्यक्ती अत्यल्प असून, उर्वरित सर्वजणांपैकी कोणासाठी वजन वाढविणे अनिवार्य आहे तर, कोणाला वजन कमी करण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. यामुळे हे पुस्तक लिहिले, असे त्यांनी सांगितले.
हे पुस्तक म्हणजे नागरिकांनी सुदृढ जीवन कसे जगावे, हे सांगणारा चांगला मार्गदर्शक व शिक्षक आहे. प्रीस्क्रिप्शनसाठी वापरण्यात येणारे वैद्यकीय चिन्ह लॅटिन भाषेतील रेसिपी शब्दापासून आले आहे. यामुळे प्रीस्क्रिप्शन हे आरोग्यवर्धक कसे राहावे, याची कृती आहे. यावरूनच पुस्तकाचे नाव ठरविण्यात आले, असा खुलासा डॉ. लाकडावाला यांनी केला.
डॉ. लाकडावाला व सहलेखिका पोषक आहारतज्ज्ञ कार्लाईन रेमेडिओस यांनी वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. हे सत्र अत्यंत माहितीवर्धक होते. कार्यक्रमात सीओडीएस ट्रस्टचे प्रधान विश्वस्त मेजर जनरल तेज कौल, भारतीय समुद्री विद्यापीठाचे प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर, आस्पी बापुना आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
काय आहे पुस्तकात
आरोग्यवर्धक जीवन कसे जगावे, यासंदर्भात पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. शरीर वळणदार ठेवण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी या पुस्तकात बरेच काही आहे. आरोग्यवर्धक आहार, शरीर सुदृढ ठेवणे व आजारांपासून दूर राहणे यासाठी नागरिकांना या पुस्तकातून प्रेरणा मिळेल. आरोग्यवर्धक आहार कसा तयार करावा, यासंदर्भात सलमान खान, फरहान अख्तर, रिना रॉय, हनी इराणी आदींनी सांगितलेल्या कृतींचा समावेश या पुस्तकात आहे. सलमान खानची आई सलमा खान यांनीही पाककृती सांगितली आहे. तसेच सलमान खानला आवडत असलेल्या पदार्थांची माहिती दिली आहे. मधुमेह, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा इत्यादी आजाराच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धक पाककृती पुस्तकात आहेत.