परिस्थिती बिघडल्यास जबाबदारी सरकारची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:03+5:302021-07-28T04:08:03+5:30
नागपूर : नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या ०.१० टक्क्यांवर आल्यानंतरही सरकार व्यापाऱ्यांवर वेळेचे निर्बंध टाकून दुपारी चार वाजता दुकाने बंद करण्यास ...

परिस्थिती बिघडल्यास जबाबदारी सरकारची
नागपूर : नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या ०.१० टक्क्यांवर आल्यानंतरही सरकार व्यापाऱ्यांवर वेळेचे निर्बंध टाकून दुपारी चार वाजता दुकाने बंद करण्यास सांगत आहे. कुठलेही आर्थिक पॅकेज न देताना व्यवसाय बंद करण्याचा कट सरकारने रचला आहे. आता यापुढे व्यापारी कोणत्याही आदेशाला न जुमानता दुकाने दुपारी चारनंतरही सुरू ठेवतील. फिजिकल विरोधानंतर परिस्थिती बिघडण्यास जबाबदारी सरकारची राहील, अशा इशारा सरकार जगाओ, वाणिज्य बचाओ संघर्ष समितीचे मुख्य संयोजक दीपेन अग्रवाल यांनी येथे दिला.
समितीच्या वतीने नागपुरात लेव्हल १ नुसार निर्बंध लागू करण्याच्या मागणीसाठी कार-बाईक रॅली मंगळवारी दुपारी एक वाजता हिस्लॉप कॉलेजसमोरून काढण्यात आली. रॅलीत जवळपास ४०० कार आणि ६०० बाईकस्वार सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागांतून ही रॅली मार्गक्रमण करीत व्हेरायटी चौकात पोहोचली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप झाला. यावेळी समितीचे सहसंयोजक दिलीप कामदार व सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.
व्यापारी आणखी तीव्र आंदोलन करणार
दीपेन अग्रवाल म्हणाले, व्यापाऱ्यांच्या आंदोलनावर सरकार काय निर्णय घेते, त्यावर व्यापाऱ्यांची भूमिका अवलंबून राहणार आहे. सरकारने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करू. जी गोष्ट सहज मिळायला हवी, ती लढून घ्यावी लागते, हे व्यापाऱ्यांचे दुर्भाग्य आहे. यापुढे लोकांना कोरोनासोबत जगावे लागणार, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानंतरही मुख्यमंत्री व्यापाऱ्यांवर वेळेचे निर्बंध का लावत आहेत? नागपुरात कोरोनापेक्षा डेंग्यूचे रुग्ण जास्त आहेत. सरकारने त्यावर लक्ष केंद्रित करावे.
तिसरी लाट थांबविण्यासाठी सरकारची तयारी नाहीच
पहिल्या लाटेनंतर सरकारने दुसरी लाट थांबविण्यासाठी काहीच तयारी केली नव्हती. तीच स्थिती आता तिसऱ्या लाटेसाठी दिसत आहे. केवळ व्यापाऱ्यांवर निर्बंध लावून काहीच होणार नाही. निर्बंधामुळे व्यापाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय मजुरांना काम नाही. ही व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. व्यापाऱ्यांमध्ये खदखद आहे. पैशांची बचत होईल, तेव्हाच लोकांना आणि व्यापाऱ्यांना तिसऱ्या लाटेचा सामना करता येईल. सरकार कुंभकर्णी झोपेत आहेत. सरकारनेच आखून दिलेला फॉर्म्युल्याचे सरकारनेच पालन करावे, त्यामुळे जीवनचक्र सुलभ होईल, असे अग्रवाल म्हणाले.
रॅलीत अश्विन मेहडिया, रामवतार तोतला, समीर अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, मनीष जेजाणी, राजेश लखोटिया, अॅड संजय के. अग्रवाल, दिनेश नायडू, गोल्डी तुली, भवानी शंकर दवे, सचिन पुनियानी, नटवर पटेल, दिनेश सारडा, अशोक संघवी, विजय तलमले, राजीव जयस्वाल, संजय काळे, आशिष देशमुख, उदय धोमणे, सुनील भाटिया, अर्जुनदास आहुजा, नीरज अग्रवाल, अभिनव ठाकूर, दीपक खुराना, सचिन इनकाने, रूषी तुली, शैकी हाफिज, सुनील राऊत, दर्शन पांडे, अंगद अरोरा, मनदीपसिंग पदम, अमित हरिंदर बेंबी, प्रकाश त्रिवेदी, विनोद त्रिवेदी, तरुण मोटवानी, विजय जयस्वाल, शरद अग्रवाल, बृजेश खेमका, राजेश अग्रवाल, प्रा. रजनीकांत बोंद्रे, प्रा. सूरज अय्यर, प्रा. पाणिनी तेलंग यांच्यासह हजारो व्यापारी उपस्थित होते.
नागपुरात निर्बंध शिथिल करा
- देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरीत्या कमी झालेले आहे. सातत्याच्या लॉकडॉऊनमुळे छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची झालेली स्थिती आता सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंध तातडीने शिथिल करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल. कोरोनाविरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. नागपुरात १७ ते २७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत एकूण ५९,९४८ चाचण्या झाल्या तर कोरोना संसर्ग आढळून आलेले रुग्ण ५८ इतके आहेत. हे प्रमाण ०.१० टक्के इतके आहे. सातत्याच्या निर्बंधामुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायी यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी चारनंतर सुरू होतो. पण, चार वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणेसुद्धा व्यावसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याची मागणी पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.