शासकीय अभियांत्रिकीचे घोडे राजकारणामुळे अडले
By Admin | Updated: July 27, 2015 03:28 IST2015-07-27T03:28:49+5:302015-07-27T03:28:49+5:30
उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया

शासकीय अभियांत्रिकीचे घोडे राजकारणामुळे अडले
नागपूर : उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया निधीअभावी अद्यापही पूर्ण झालेली नाही. असे असतानाच आता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता वर्धा मार्गावरील जागा सुचविली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या प्रयत्नातून उत्तर नागपुरात आलेले महाविद्यालय वर्धा मार्गाकडे जाते की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. परंतु राजकारणाच्या या एकूणच चक्रात विद्यार्थी मात्र हक्काच्या महाविद्यालयाला मुकत आहेत.
गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर येथील राजीव गांधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून बाहेर झाले. त्यानंतर उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे ही मागणी जोर धरायला लागली होती. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळायलाच बरीच प्रतीक्षा करावी लागली. प्रस्तावित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी कामठी रोड येथील ‘आॅटोमोटिव्ह’ चौकाजवळील मौजा वांजरी परिसरातील ७.४७ एकर जागा अंतिम करण्यात आली. तत्कालीन मंत्री नितीन राऊत यांनी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु त्यानंतर अनेक महिने निघून गेले व सत्ताबदलदेखील झाला. परंतु अद्यापपर्यंत ही जागा तंत्रशिक्षण संचालनालयाला मिळालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे २१.५० कोटी रुपयाचा दर निश्चित केला असून ही रक्कम मागील वर्षी २५ डिसेंबरपर्यंत भरण्यासंदर्भात शासनाला कळविले होते.
शिवाय दरवर्षी ५३ लाख रुपयांचीदेखील ‘एनआयटी’ कडून मागणी करण्यात आली. ‘आयआयएम’साठी तात्काळ पावले उचलणाऱ्या राज्य शासनाकडून अंतिम निर्णय झालेला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
दरम्यान, रविवारी ‘आयआयएम-एन’च्या उद्घाटनप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन जागेचा मुद्दा काढला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी वर्धा मार्गावरील १० एकरची जागा वापरता येईल. ही जागा आरक्षित असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. जर अगोदरच जागा अंतिम करण्यात आली आहे तर मग नवीन जागेसंदर्भात वक्तव्य राजकीय कारणांतून करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात बावनकुळे तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)