हप्ता वसुलीसाठी गुंडांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST2020-11-26T04:21:07+5:302020-11-26T04:21:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका गुंडाने इमामवाड्यात हैदोस घातला. किराणा दुकानदारावर हप्ता ...

हप्ता वसुलीसाठी गुंडांचा हैदोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका गुंडाने इमामवाड्यात हैदोस घातला. किराणा दुकानदारावर हप्ता वसुलीसाठी कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याला जखमी करून दुकानाचा गल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास ही घटना घडली. पापा ऊर्फ संदीप राजेश जाधव (वय ४०) असे या गुंडाचे नाव असून तो करबला, धोबीघाट परिसरात राहतो.
प्रणव लवकुमार बनोदे (वय २७) हे गणेश नगरात राहतात. त्यांचे इमामवाडा चौकात किराणा स्टोअर्स आहे. सोमवारी सायंकाळी आरोपी पापा हा बनोदे यांच्या किराणा दुकानात आला. त्याने दुकानाच्या गल्ल्यातील रक्कम जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता आरोपी पापाने बनोदे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. रोज पाचशे रुपये खंडणी द्यावी लागेल, अन्यथा जिवे ठार मारीन अशी धमकीही आरोपीने दिली. दरम्यान, आरडाओरडा ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. बनोदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपी पापाची चौकशी सुरू आहे.