लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मौदा शहरालगतच्या मौदा- रामटेक मार्गालगत असलेल्या महामाया अॅग्रो या द्रोण तयार करणाऱ्या कंपनीत फटाक्यांची निर्मिती केली जात होती. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. १९) या कंपनीची पाहणी करीत शहानिशा केली. तिथे फटाक्यांची अवैधरीत्या निर्मिती केली जात असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी दोघांना अटक करीत संपूर्ण कंपनी सील केली.
कैलास गुलाबचंद अग्रवाल (५५, रा. हॉटेल सिद्धीसमोर, अग्रेसन चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर) व मिलिंद चंदू ठाकरे (३४, रा. वडोदा, ता. कामठी, जिल्हा नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कैलास अग्रवाल यांची मौदा शहरालगत महामाया अॅग्रो नामक कंपनी आहे. या कंपनीत द्रोणची निर्मिती केली जात असल्याची अनेकांना माहिती होती. मात्र, मागील काही दिवसांपासून याच कंपनीत फटक्यांची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्या माहितीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांनी सावनेर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी या कंपनीची प्रत्यक्ष पाहणी केली. तिथे कच्चे पॉपअप अॅगबर्ड फटाके, ते तयार करण्याच्या मशीन, कागद, प्लास्टिक, रेती, रसायन, टॉप टायगर सुतळी बॉम्ब, ते भरून बाजारात पाठविण्यासाठी लागणारे लहान, मोठे बॉक्स व इतर आवश्यक साहित्य आढळून आले. त्यामुळे संतोष गायकवाड यांनी याबाबत मिलिंद ठाकरे याच्याकडे विचारणा केली आणि लगेच कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. या तपासणीत महामाया अॅग्रो कंपनीकडे फटाके तयार करण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करीत आतील संपूर्ण साहित्य जप्त केले व कंपनीला सील ठाकले. शिवाय, कंपनी मालक कैलास अग्रवाल व मिलिंद ठाकरे या दोघांना ताब्यात घेत अटक केली.
या दोघांच्या विरोधात मौदा पोलिसांनी स्फोटक अधिनियम १८८४ चे सहकलम ५, ६, स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ सहकलम भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २७०, २८७, २८८ ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. मौदा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची म्हणजेच सोमवार (दि. २२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मौदा पोलिस करीत आहेत.
कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एकूण १ कोटी ७लाख १६ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात कंपनीतील कच्चे व पक्के फटाके, ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन, कच्चा माल, खरड्यांचे लहान मोठे बॉक्स, प्लास्टिक क्रेट, स्फोटक पदार्थ व रसायने, यूपी-८३/बीके-५२४१ क्रमांकाची कार, सीजी-०४/एमके-०३९ क्रमांकाचा ट्रक, दोन मोबाइल फोन व इतर साहित्याचा समावेश आहे.
मोठी दुर्घटना घडली असती तर...
ही कंपनी कैलास अग्रवाल, नागपूर, मिलिंद ठाकरे, वडोदा आणि दीपककुमार, फिरोझाबाद (उत्तर प्रदेश) या तिघांच्या मालकीची आहे. दीपककुमार यांना मात्र अटक करण्यात आली नाही. या ठिकाणी नेमकी कधीपासून फटक्यांची निर्मिती केली जात होती, ही माहिती पोलिसांनी दिली नाही. ही कंपनी नागरी वस्तीला लागून आहे. आत फटाके तयार करण्यासाठी वापरले जाणारे स्फोटक पदार्थ व घातक रसायने होती. शिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. आग लागून स्फोटक पदार्थ व रसायने जळाली असती तर त्याचा परिणाम लगतच्या घरे व नागरिकांवर झाला असता.