नंबरचा गोलमाल,कोण होतय मालामाल?
By Admin | Updated: January 11, 2017 02:40 IST2017-01-11T02:40:58+5:302017-01-11T02:40:58+5:30
वाहनांच्या बाबतीत एकाच क्रमांकाची दोन वाहने राहूच शकत नाही. पण नागपूर शहर प्रादेशिक परिवहन

नंबरचा गोलमाल,कोण होतय मालामाल?
एकाच क्रमांकाची दोन वाहने : ई-चालानमधून उघड झाले प्रकरण
विशाल महाकाळकर नागपूर
वाहनांच्या बाबतीत एकाच क्रमांकाची दोन वाहने राहूच शकत नाही. पण नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अजब कारभारामुळे वाहनांना एकच नंबर दोनदा दिल्याचा प्रकार घडला आहे. आरटीओच्या या कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे, ‘ई चालान’ने.
‘स्मार्ट सिटी’कडे पाऊल टाकत असलेल्या नागपुरात आता वाहतुकीचे नियम तोडणारे तंत्रज्ञानाच्या मदतीने कायद्याच्या सापळ्यात सापडत आहेत. चौकाचौकात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून वाहतूक पोलिसांतर्फे सिग्नलवरील घडामोडींवर बारीक नजर ठेवली जात आहे. नियम तोडणाऱ्यांच्या घरी थेट ‘ई-चालान’ पोहोचविले जात आहे. या चालानमधून अनेक बोगस प्रकरणेही सामोर येत आहे. महात्मा गांधीनगर येथे राहणारे मिलिंद भय्याजी मांडवेकर यांच्यासोबत झालेला प्रकारही त्यातलाच एक आहे.
२५ नोव्हेंबर रोजी एलआयसी चौकात विना हेल्मेट वाहन चालवीत असल्याने मांडवेकर यांना ई-चालान मिळाले. परंतु चालानमधील छायाचित्रातील व्यक्ती अनोळखी होती. मात्र, दुचाकीचा क्रमांक एमएच ३१ डीई ८६४८ सारखाच होता. एकाच क्रमांकाची दोन वाहने कशी असू शकतात, या संशयावरून मांडवेकर यांनी सिव्हिल लाईन्स येथील वाहतूक शाखेत तक्रार केली. तेथील अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचे रंगीत छायाचित्र दिले. यात हिरो प्लेझर ही निळ्या रंगाची आढळून आली तर त्यांच्याकडे याच कंपनीची मात्र काळ्या रंगाची दुचाकी आहे.
वाहतूक पोलिसांनी अधिक चौकशीसाठी आरटीओ कार्यालयात पाठविले. आरटीओने तपासणी केल्यावर इंजिन क्रमांकापासून ते चेसीस क्रमांक सारखेच आढळले. एकाच क्रमांकाची दोन वाहने असल्याचा खुलासा झाल्याने वाहतूक शाखेने चालानवर तसे नमूद करून चालान रद्द केले. धक्कादायक म्हणजे, या घटनेची गंभीर दखल ना आरटीओ कार्यालयाने घेतली ना वाहतूक शाखेने. यामुळे आजही या एकाच क्रमांकाची दोन वाहने रस्त्यावर धावत आहेत. ई-चालान वाचविण्यासाठी अशी बोगसगिरी तर केली जात नाही ना, अशी शंकाही या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केली जात आहे.