गोल्डीसह चौघांना मोक्कातून सशर्त जामीन
By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:13+5:302016-01-02T08:37:13+5:30
जरीपटका भागातील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींची मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी

गोल्डीसह चौघांना मोक्कातून सशर्त जामीन
नागपूर : जरीपटका भागातील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींची मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली.
हरदीपसिंग ऊर्फ गोल्डी कुलवंतसिंग भुल्लर, निर्मलसिंग ऊर्फ बबलू सतनामसिंग अटवाल, जोगराजसिंग ऊर्फ काके कश्मिरसिंग धिल्लन आणि जुज्जरसिंग ऊर्फ जहरी कश्मिीरसिंग धिल्लन, अशी या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयाने २५ हजाराच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
आरोपींनी भविष्यात यासारखा अपराध करू नये, साक्षीदारांना फितवू नये, अशा अटी न्यायालयाने जामीन आदेशात नमूद केल्या आहेत.
या आरोपींविरुद्ध भादंविच्या १४७, १४८, १४९, ३०७, शस्त्र कायद्याच्या ३/२५ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम ३, ४ अन्वये गुन्हे दाखल आहेत. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिटल सरदार आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार केल्याचा गोल्डी आणि त्याच्या साथीदारांवर आरोप आहे. गोळीबाराच्या घटनेत एक गोळी लिटल सरदारच्या ड्रायव्हरच्या छातीला लागली होती. या आरोपींविरुद्ध जमीन बळकावण्याचा, दुखापत करण्याचा , हल्ला करण्याचा आणि धमकी देण्याची प्रकरणे पोलिसांत दाखल आहेत.
आरोपींचे वकील अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, लिटल सरदार आणि टोळीसोबत आरोपींची चकमक झाली होती. या प्रकरणातील फिर्यादीचे वर्तन संशयास्पद आहे. तो गोळीबारात जखमी झाला परंतु गोळी वाहनाच्या गिअरजवळ आढळली होती. गोळी लागल्यानंतरही तो इकडेतिकडे भटकत होता. दुसऱ्या दिवशी त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याने स्वत:वरील गोळीबाराची तक्रार केली होती. लिटल सरदार आणि टोळीने कारमधून उतरून आरोपींचा पाठलाग केला होता. आरोपींजवळ पिस्तूल होते तर मग ते पळाले का, पोलिसांनी कोणत्याही आरोपींकडून पिस्तूल जप्त केलेले नाही. ड्रायव्हरची जखम गोळीबाराचीच आहे, याबाबत स्पष्ट अभिप्राय नाही. त्यामुळे गुन्ह्याचा एफआयआर खोटा ठरतो, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी ह्या आपल्या युक्तिवादात जामिनाचा विरोध करताना म्हणाल्या की, गुन्हेगाराची ही संघटित टोळी असून खंडणी,जमीन बळकाव, खुनाचा प्रयत्न, अशा गंभीर प्रकरणात या टोळीचा सहभाग आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)