व्यावसायिक नाटकांच्या पायाभरणीची सुवर्णसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:05 IST2020-06-09T11:03:22+5:302020-06-09T11:05:34+5:30
नागपूरकर नागपूरचीच नाटके बघायला येत नाहीत, यासाठी सर्वस्वी कलावंतच जबाबदार आहेत आणि हीच जबाबदारी समजून शहराच्या नव्या भागांमध्ये नाटक म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे कार्य रंगकर्मींना करावे लागणार आहे.

व्यावसायिक नाटकांच्या पायाभरणीची सुवर्णसंधी
प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यावसायिकता नसली किंवा व्यावहारिक दृष्टिकोन नसला की हौसेला तितकेसे मोल नसते. नेमकी हीच बाब विदर्भातील हौशी रंगकर्मींनी समजून घेणे गरजेचे आहे आणि ती संधी लॉकडाऊनने दिली आहे.
नाटकांमधील व्यावसायिकता म्हटली की थेट नजरा वळतात पुणे आणि मुंबईकडे अन् हौशी नाटके म्हटली की विदर्भाकडे! पण, विदर्भातही झाडीपट्टी रंगभूमीने तद्दन व्यावसायिकता जपली आहे, याचा विसर जसा अनेकांना पडतो तसाच तो हौशी रंगकर्मींनाही पडतो. यामुळेच हौशी रंगकर्मी व्यावसायिक स्पर्धेत एकटी पाडत असल्याचे वारंवार दिसून येते. उत्तम कलागुण व कलामूल्य असूनही केवळ व्यावसायिकता नसल्यामुळे हौशी रंगकर्मींचे नाट्यक्षेत्रातील स्थान उपऱ्यासारखेच आहे. त्यामुळेच, हौशी रंगकर्मींच्या मागण्यांचे सरकारला तेवढेसे महत्त्व वाटत नाही अन् नाईलाजाने पालक म्हणवल्या जाणाºया नाट्य परिषदेची तर हौशी म्हणजे फालतू अशी ठाम समजूत झाली आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे आता पुढचे काही महिने तरी सिनेमागृहे व नाट्यगृहे खुली होणार नाहीत. त्यामुळे, हौशी असो वा व्यावसायिक नाट्यक्षेत्राचे गणित तर पार कोलमडले आहे. सगळेच एकजात रंगमंचीय वावरापासून अलिप्त झाले आहेत. संपूर्ण टाळेबंदीतून जेव्हा बाहेर पडायचे असेल, तेव्हा सगळ्यांसाठीच नवी सुरुवात असणार आहे. या सुरुवातीला सुवर्णसंधीत परावर्तित करण्याची संधी हौशी रंगकर्मींनी करणे गरजेचे आहे.
पेलावे रसिकनिर्मितीचे आव्हान
पुणे-मुंबईच्या व्यावसायिक नाटकांना नागपूरमधूनच मोठ्या प्रमाणात रसिक मिळतात. मात्र, नागपूरच्याच नाटकांना नागपूरकर प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी वारंवार आल्या आहेत. या तक्रारी चुकीच्या नाहीत. मात्र, नागपूरच्या रंगकर्मींनी स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्याकडे जाणीवपूर्वक कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे नागपूरकर नागपूरचीच नाटके बघायला येत नाहीत, यासाठी सर्वस्वी कलावंतच जबाबदार आहेत आणि हीच जबाबदारी समजून शहराच्या नव्या भागांमध्ये नाटक म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे कार्य रंगकर्मींना करावे लागणार आहे.
कलावंतांना आत्मनिर्भर होण्यासाठी द्यावे प्रोत्साहन
ज्याप्रमाणे कलावंतांनी रसिकनिर्मिती करण्याचे आव्हान पेलण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे रसिकांनीही कलावंतांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दुसऱ्याचे ते चांगले आणि आपले ते वंगाळ, या दुराग्रहातून रसिकांनी बाहेर पडावे आणि आपल्या कलावंतांना पाठबळ दिले तर कलावंतांना धीर मिळणार आहे.
नागपूरच्या गायकांकडून धडा शिकणे गरजेचे
नागपुरात हिंदी, मराठी चित्रपटगीतांचे कार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. प्रारंभी हौस म्हणून गायनास सुरुवात करणारे आज व्यावसायिक गायक म्हणून स्थापित झाले आहेत. दर आठवड्यात या कलावंतांचे गायनाचे कार्यक्रम होतात आणि रसिकवर्गही मोठ्या संख्येने तिकीट काढून येत असतो. याच गायकांकडून हौशी रंगकर्मींनी धडा घेणे गरजेचे आहे.