रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 08:54 PM2020-02-11T20:54:53+5:302020-02-11T20:56:37+5:30

आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.

The golden days for the Republican Party will come: trust of Jogendra Kawade | रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास

रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास

googlenewsNext
ठळक मुद्देआर.आर. पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आर.आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी धम्माचा प्रचार, आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्यासाठी जीवाचे रान केले, खस्ता खाल्ल्या. त्यांचे कार्य व्यर्थ जाणार नाही. आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.
प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रघुनाथराव ऊर्फ आर. आर. पाटील यांच्या २६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात त्यांच्या तैलचित्राचे मंगळवारी अनावरण करण्यात आले. यावेळी प्रा. कवाडे बोलत होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. राजेंद्र पाटील, हरिदास टेंभुर्णे, स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, विलास गजघाटे तसेच आर. आर. यांचा मुलगा वसंतराव पाटील, स्नुषा हेमलता पाटील आणि मुलगी नलिनीताई पुडके प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. कवाडे पुढे म्हणाले, माणसे स्वत:साठी जगतात पण काही लोक स्वत:सोबत इतरांच्या, समाजाच्या भल्यासाठी जगतात. आर. आर. पाटील हेही समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार रुजविण्यासाठी अनमोल असे कार्य केले. केवळ स्वत: नाही तर संपूर्ण कुटुंब त्यांनी या कार्यासाठी वाहून घेतले. त्याग आणि बलिदानाशिवाय काहीच मिळत नाही. बाबासाहेबांच्या त्यागामुळे कोट्यवधी समाजाला सन्मानाचे जीवन मिळाले. त्यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन पाटील यांनीही स्वत:ला चळवळीत झोकून दिले आणि त्यासाठी मृत्यूपर्यंत कार्य केले. ते खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे सेनापती होते, असे गौरवोद््गार प्रा. कवाडे यांनी काढले.
अ‍ॅड. राजेंद्र पाटील आणि हरिदास टेंभुर्णे यांनीही पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एम्प्रेस मिलमध्ये नोकरी मिळाल्यापासून भानखेड्यात वास्तव्य असताना आंबेडकरी चळवळीशी जुळलेला त्यांचा संबंध, स्वतंत्र मजूर पक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख म्हणून केलेले कार्य आणि डॉ. बाबासाहेब यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी आणि पुढे दीक्षाभूमी व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत असलेल्या त्यांच्या योगदानाचाही उलगडा या ज्येष्ठ विचारवंतांनी केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शैलेश बहादुरे यांनी केला तर वसंतराव पाटील यांनी आभार मानले.

Web Title: The golden days for the Republican Party will come: trust of Jogendra Kawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.