महिन्यात सोने तीन हजारांनी गडगडले!

By Admin | Updated: May 30, 2014 01:14 IST2014-05-30T01:14:30+5:302014-05-30T01:14:30+5:30

एनडीएची बहुमतातील सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सोने आयातीच्या नियमात शिथिलता आणल्याने देशातील सराफा बाजारात सोने स्वस्त झाले. यावर्षी आतापर्यंंंतची सर्वात मोठी घसरण आहे.

Gold Threats Thousands Thousand | महिन्यात सोने तीन हजारांनी गडगडले!

महिन्यात सोने तीन हजारांनी गडगडले!

ग्राहकांचा अभाव : दर आणखी उतरण्याची अपेक्षा
मोरेश्‍वर मानापुरे - नागपूर
एनडीएची बहुमतातील सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सोने आयातीच्या नियमात शिथिलता  आणल्याने देशातील सराफा बाजारात सोने स्वस्त झाले. यावर्षी आतापर्यंंंतची सर्वात मोठी घसरण  आहे. दीड वर्षात सोन्यात ६६00  रुपये तर मे महिन्यात सोने तीन हजार रुपयांनी गडगडले.  सोन्याच्या झळाळीला उतरली कळा असली तरीही ग्राहकांसाठी ही शुभ वार्ता आहे.
याआधी १७ एप्रिल २0१३ रोजी शुद्ध सोन्याच्या दरात २६,५९0 रुपयांपर्यंंंत घसरण झाली होती.  गेल्यावर्षी ही सर्वात मोठी घसरण होती. याउलट २६ नोव्हेंबर २0१२ रोजी १0 ग्रॅम शुद्ध सोन्याने  ३२,९२५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यादिवसापासून ते २९ मे २0१४ पर्यंंंत अर्थात दीड  वर्षात सोने ६६00 रुपयांनी कमी झाले. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात  किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्यात होणार्‍या चढउतारामुळे लोकांनी  सोन्यात गुंतवणूक थांबविली आहे. माहितीनुसार यावर्षी १ जानेवारीला १0 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर  २९,६१५ रुपयांवर होते. १ फेब्रुवारीला ३0 हजार, १ मार्चला ३0,७५0 रुपये, १ एप्रिलला  २८,९00 रुपये आणि १ मे रोजी सोन्याचे दर ३0,५२५ रुपयांवर होते. चालू आर्थिक वर्षात  सोन्याला मागणी फारच कमी राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंंंत  सोन्याचे दर खालीच राहील, असा निष्कर्ष आहे. दरम्यान, लग्नसराई आणि सोने याचे नाते अतूट  असल्याने सोने खरेदी करणार्‍यांसाठी दिलासा देणारी ही बाब आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमकुवत झाला तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरला जातो.  त्यामुळे सोन्याची मागणी वाढून दरही वाढतात. आता अमेरिका आणि युरोपीय देशांची आर्थिक  स्थिती सुधारू लागली असून रुपया उच्चांकावर गेला आहे.
सोने २६ हजारावर स्थिरावणार!
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीनुसार देशात सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर २६ हजारांवर  स्थिरावतील, असा अंदाज आहे. सोन्याचे दर उतरतात तेव्हा ग्राहक दर आणखी कमी होतील, या  अपेक्षेने बाजाराकडे पाठ फिरवितात. याउलट दर वाढतात तेव्हा ते खरेदीसाठी गर्दी करतात. कमी  दरात खरेदी केल्याचा आनंद ग्राहकांच्या चेहर्‍यांवर झळकत असतो. सध्या ग्राहकांसाठी खरेदीची  उत्तम संधी असल्याची प्रतिक्रिया करण कोठारी ज्वेलर्सचे संचालक प्रदीप कोठारी यांनी  लोकमतशी बोलताना दिली.
उतरणीचा क्रम सुरूच राहील
गुंतवणूकदारांसाठी सोने हा तितका आकर्षक पर्याय राहणार नाही. त्यामुळे सोन्याचे भाव आणखी  गडगडण्याची शक्यता आहे. स्थानिक स्तरावर सोने जागतिक बाजारातील किमतीनुसार स्वस्त  होईल, अशी माहिती सराफांनी सांगितले.  आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीनुसार दिवाळीपर्यंंंत  सोन्याचे दर आणखी तीन ते चार हजार रुपयांनी कमी होण्याची शक्यता इंडिया रेटिंग्ज अँण्ड  रिसर्च संस्थेने व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी घटली आहे. जगात  भारतातच सोन्याला जास्त मागणी आहे. ग्राहकांची ‘वेट अँण्ड वॉच’ची भूमिका आहे.
सोन्याच्या गुंतवणुकीत परतावा कमी
गेल्या दीड वर्षात सोन्यात परतावा फारच कमी आहे. २0१0 मध्ये सोन्याने २८ टक्के आणि  २0११ मध्ये सर्वाधिक ३७ टक्के परतावा दिला होता. २0१२ मध्ये तो १0 टक्क्यांपर्यंंंत खाली  आला. सोन्याचे दर कमी झाल्याने महागाईपासून काही प्रमाणात सामान्य गुंतवणूकदारांना दिलासा  मिळाला आहे.
चांदीत २२,४00 रुपयांची घसरण
सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठय़ा प्रमाणात घसरण सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत आठ  हजारांची घसरण होऊन चांदीचे दर २९ मे रोजी ४0,९00 रुपयांवर स्थिरावले. याआधीची  आकडेवारी पाहता २६ नोव्हेंबर २0१२ रोजी औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्यानंतर चांदी  ६३,३00 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती. अर्थात दीड वर्षात चांदीत २२,४00 रुपयांची  घसरण झाली. सध्या चांदीला मागणी नसल्याचे सराफांनी सांगितले.  (प्रतिनिधी)
 

Web Title: Gold Threats Thousands Thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.