सोने २४०० तर चांदीत ९ हजारांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:57 IST2020-08-12T23:56:22+5:302020-08-12T23:57:41+5:30
आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम आज देशांतर्गत स्थानिक बाजारात दिसून आला. बुधवारी सायंकाळी व्यवहार बंद होताना सोन्याचे दर २४०० रुपये आणि चांदीत तब्बल ९ हजार रुपयांची घसरण होऊन भाव अनुक्रमे ५३,२०० रुपये १० ग्रॅम आणि एक किलो चांदी ६५,५०० रुपयांवर स्थिरावली.

सोने २४०० तर चांदीत ९ हजारांची घसरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम आज देशांतर्गत स्थानिक बाजारात दिसून आला. बुधवारी सायंकाळी व्यवहार बंद होताना सोन्याचे दर २४०० रुपये आणि चांदीत तब्बल ९ हजार रुपयांची घसरण होऊन भाव अनुक्रमे ५३,२०० रुपये १० ग्रॅम आणि एक किलो चांदी ६५,५०० रुपयांवर स्थिरावली.
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळच्या सत्रात सोने ३८०० रुपयांनी कमी होऊन ५१,८०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने भाव पुन्हा वाढून दुपारच्या सत्रात ५३,५०० रुपयांपर्यंत वाढले. त्यानंतर अखेरच्या सत्रात ५३,२०० रुपयांवर स्थिरावले. याशिवाय चांदी सकाळच्या सत्रात मंगळवारच्या ७४,५०० रुपयांच्या तुलनेत ६१,५०० रुपयांपर्यंत घसरली. त्यानंतर दुपारच्या सत्रात ६५,५०० रुपयांपर्यंत वाढली आणि व्यवहार बंद होताना त्याच भावावर स्थिरावली. सराफांतर्फे विक्री करताना या भावात जीएसटी आणि मेकिंग व हॉलमार्क चार्जेस आकारण्यात येतात.
ग्राहकांसाठी प्रॉफिट बुकिंगची वेळ
बुधवारी भावात चढउतार दिसून आली. भाव कमी झाले तेव्हा ग्राहकांसाठी प्रॉफिट बुकिंगची वेळ होती. सोने आणि चांदीचे भाव फार कमी होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना खरेदीची हीच वेळ आहे.
राजेश रोकडे, सचिव नागपूर सराफा असोसिएशन.