सोने ८७५ रुपयांनी घसरले
By Admin | Updated: June 2, 2014 02:14 IST2014-06-02T02:14:53+5:302014-06-02T02:14:53+5:30
जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे.

सोने ८७५ रुपयांनी घसरले
नागपूर : जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. भाव आणखी कमी होतील, या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली. शिवाय कॉर्पोरेट क्षेत्राकडून मागणी नसल्याने गेल्या आठवड्यात १0 ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ८७५ रुपयांनी कमी झाले. पुढील आठवड्यात सोन्याचे भाव २७ हजारांच्या आत येतील, अशी शक्यता सराफांनी वर्तविली. गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच सातही दिवस सोन्यात घसरण झाली. स्थानिक सराफा बाजारात सोमवारी शुद्ध सोने २५ रुपयांची घसरले. मंगळवारी पुन्हा घसरण होऊन भावपातळी २८,१५0 रुपयांवर स्थिरावली. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार बुधवारीसुद्धा सोन्यात तब्बल ३५0 रुपयांची घसरण झाली. यादिवशी भाव पहिल्यांदाच २८ हजारांच्या आत आले. सोन्यात सुरू असलेली घसरण गुरुवार, २९ मे रोजी सुरूच होती. यादिवशी शुद्ध सोने २00 रुपयांनी उतरले. शुक्रवारीही ५0 रुपयांनी कमी होऊन २७,५५0 रुपयांत विक्री झाली. शनिवारी बाजार बंद होतेवेळी सोने १00 रुपयांनी कमी झाले. त्यादिवशी २४ कॅरेट सोन्याचे भाव २७,४५0 रुपये, २३ कॅरेट २७,२00 आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव २६,९५0 रुपयांपर्यंंत खाली आले. वर्षभरापूर्वी शुद्ध सोने २६,६00 रुपयांपर्यंंत खाली उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. या पातळीपर्यंंत सोने खाली उतरेल, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. ग्राहकांना खरेदी करता येईल, एवढी पातळी सोन्याने ओलांडली आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी पुन्हा वाट पाहू नये, असे सराफांनी सांगितले. याशिवाय शुद्ध चांदी किलोमागे ११00 रुपयांनी कमी होऊन भाव ४0,८00 रुपयांवर पोहोचले. पुढील आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घट होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. सोन्यात आणखी घसरण होईल, या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदी थांबविली आहे. याशिवाय लग्नसराईची खरेदी संपल्याने बाजारात ग्राहकी कमी आहे. (प्रतिनिधी)