ग्लोव्हज, औषधीही नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:21+5:302021-02-09T04:10:21+5:30
नागपूर : आशेचे किरण म्हणून ज्या मेयो, मेडिकलकडे पाहिले जाते त्याच रुग्णालयामध्ये आता साध्या ग्लोव्हजसह औषधांचा तुटवडा पडल्याने गरीब ...

ग्लोव्हज, औषधीही नाहीत
नागपूर : आशेचे किरण म्हणून ज्या मेयो, मेडिकलकडे पाहिले जाते त्याच रुग्णालयामध्ये आता साध्या ग्लोव्हजसह औषधांचा तुटवडा पडल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी लागणारे साहित्य बाहेरून विकत आणण्यास सांगितले जात असल्याने निवासी डॉक्टर अडचणीत आले आहे. यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. या बाबत निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’चा पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी बोलून आपली समस्या मांडली. त्यांनी या महिन्याच्या शेवटपर्यंत तुटवड्याची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व शासनाचे अन्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे, तद्अनुषंगिक उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणांची खरेदीचे अधिकार हाफकिनकडे आहे. परंतु मेयो, मेडिकलला वर्षाला लागणाऱ्या औषधांच्या तुलनेत ५० टक्केही निधी मिळाला नाही. यामुळे मागणीच्या तुलनेत हाफकिनकडे फार कमी निधी जमा झाल्याने औषधांचा तुटवडा पडल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, औषधे खरेदीसाठी लागणारा ९० टक्के निधी संबंधित हाफकिनकडे वळता करावा लागतो, तर १० टक्के निधी हा स्थानिक खरेदीसाठी वापरावा लागतो. सध्या याच निधीवर मेयो, मेडिकलच्या औषधांचा कार्यभाग साधला जात आहे. यामुळे मोजकाच औषधांचा साठा उपलब्ध असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.
-आधी ग्लोव्हज, नंतरच शस्त्रक्रिया
मेयो, मेडिकलमध्ये किरकोळ व गंभीर स्वरूपातील दिवसाकाठी १५ ते २५ शस्त्रक्रिया होतात. परंतु ग्लोव्हजचा तुटवडा पडल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना शस्त्रक्रिया आधी ग्लोव्हज आणायला सांगितले जात आहे. ग्लोव्हज आणल्यावरच शस्त्रक्रियांना हात लावला जात असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
-औषधांचा तुटवडा दूर करण्याचे आश्वासन
रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विविध मेडिकलमधील ‘मार्ड’ संघटनेने वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली. मेडिकल मार्ड संघटनेने औषध तुटवड्याचा मुद्दा मांडला. यावर डॉ. लहाने यांनी या महिन्याच्या शेवटपर्यंत औषधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वर्षभरापासून बंद असलेल्या एमआरआय यंत्राबाबत त्यांनी मात्र वेळ मारून नेल्याचे मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.