लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या सेवाज्येष्ठता यादीत तेरा तालुक्यांपैकी उमरेड, भिवापूर, काटोल आणि कळमेश्वर या चार तालुक्यांतील एकाही शिक्षकाचे नाव नाही. ही बाब शिक्षकांशी सरळसरळ अन्याय करणारी असून, यातून विभागाचा गलथान कारभार पुढे आला आहे. यादीतील घोळामुळे शिक्षकांत संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासन स्तरावर ही यादी तातडीने अद्यावत करून तेराही तालुक्यातील शिक्षकांची नावे समाविष्ट असलेली परिपूर्ण यादी नव्याने प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस निळकंठ लोहकरे यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. १३ ऑक्टोबर २०१६ चे शासन परिपत्रकानुसार एकूण मंजूर विषय पदवीधर शिक्षकांपैकी ३३ टक्के शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याची तरतूद आहे. परंतु २०१७ पासून नियुक्ती करण्यात आलेल्या विषय पदवीधर शिक्षकांना अजूनपर्यंत पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. संबंधित पात्र शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी, याबाबत संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून सेवाज्येष्ठता यादी शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध तर करण्यात आली, परंतु त्यातील त्रुटी आणि अपूर्णता लक्षात घेता, शिक्षण विभागाच्या कार्यशैलीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ज्या तालुक्यातील नावे यादीत समाविष्ट नाहीत, त्याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यात यावा व त्या तालुक्यातील नावांचा व इतर तालुक्यांतील सुटलेल्या नावांचा समावेश करून अद्यावत ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस निळकंठ लोहकरे आदींसह अनिल नासरे, विलास काळमेघ, राजू बोकडे, सुरेश श्रीखंडे, प्रकाश सव्वालाखे, उज्ज्वल रोकडे, धर्मेंद्र गिरडकर, अशोक तोंडे, अनिल श्रीगिरीवार, नरेंद्र वरघणे, यादव नारनवरे, सुरेश भोसकर, जगदीश पवार, दिलीप केणे, पी. टी. मानकर, संजय आवारी, अनिल पन्नासे, स्वप्नील रोकडे, मोरेश्वर तुपे आदींनी केली आहे.
अशा आहेत त्रुटी
- चार तालुके पूर्णपणे वगळले
- पात्र शिक्षकांचा सेवाज्येष्ठता क्रम बिघडवून टाकलेला.
- पात्रांची नावे गायब तर अपात्रांची मात्र समाविष्ट.
- माहिती नेमणुकीच्या वर्षनिहाय गोळा, पण वर्षनिहाय यादीच नाही.