अपहरण करून तरुणीची राजस्थानमध्ये विक्री
By Admin | Updated: July 16, 2014 01:16 IST2014-07-16T01:16:12+5:302014-07-16T01:16:12+5:30
पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या महिला साथीदारांच्या मदतीने एका तरुणीचे अपहरण केले आणि नंतर तिची राजस्थानमध्ये नेऊन विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवघ्या पोलीस दलाचीच

अपहरण करून तरुणीची राजस्थानमध्ये विक्री
पोलीस हवालदार मुख्य आरोपी : दोन महिलांचाही सहभाग
नरेश डोंगरे - नागपूर
पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या महिला साथीदारांच्या मदतीने एका तरुणीचे अपहरण केले आणि नंतर तिची राजस्थानमध्ये नेऊन विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवघ्या पोलीस दलाचीच मान शरमेने झुकविणारे हे प्रकरण गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हवालदाराचे नाव संतोष असून, तो परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. (लोकमतला संपूर्ण माहिती आहे. मात्र, त्या पोलीस ठाण्याची बदनामी होऊ नये आणि तपासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून, आज त्याचे पूर्ण नाव आणि नियुक्तीचे स्थान छापण्याचे आम्ही टाळत आहोत.काही दिवसांपूर्वी गिट्टीखदानमधील रजनी (वय २५, नाव काल्पनिक) अचानक बेपत्ता झाली. पोलीस तपासात रजनीचे अपहरण करून राजस्थानमध्ये तिची विक्री झाल्याची धक्कादायक माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कसून तपास केला असता पोलीस दलाला हादरा देणारी माहिती उघड झाली. रजनीचे अपहरण आणि राजस्थानमध्ये नेऊन विकण्याचा गंभीर गुन्हा एका पोलीस हवालदाराने केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे शहर पोलीस दलातील वरिष्ठ कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी या आरोपी हवालदाराला नजरकैद करून त्याच्या मीना नामक मैत्रिणीलाही ताब्यात घेतले. या दोघांच्या माहितीवरून अपहृत रजनीचा पत्ता मिळवण्यात आला असून, पोलीस पथक तिची सोडवणूक करण्यासाठी राजस्थानला रवाना झाले. अपहरण आणि विक्रीसारख्या गंभीर गुन्ह्यात खुद्द पोलीस हवालदारच मुख्य आरोपी असल्याने हे प्रकरण अत्यंत गोपनीय पध्दतीने हाताळले जात आहे.