घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

By मोरेश्वर मानापुरे | Published: February 18, 2024 11:31 PM2024-02-18T23:31:32+5:302024-02-18T23:34:00+5:30

कळमन्यात दररोज १२० टन आवक : घाऊक २०० रुपये तर किरकोळमध्ये ४०० रुपये किलो, दरवाढीवर नियंत्रण आणावे

Garlic landed wholesale; But expensive in retail | घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

नागपूर : भाजीच्या चवीसाठी असलेली लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. घाऊकमध्ये भाव २०० रुपयांपर्यंत उतरल्यानंतरही किरकोळ विक्रेते ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. कळमन्यात चार दिवसांपासून पुरवठा वाढल्याने उत्तम दर्जाच्या लसणाची २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या दररोज १२० टन लसणाचा पुरवठा होतो, हे विशेष.

चार महिन्यांपासून आवक कमी
दरवाढीमुळे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाची जागा डिसेंबरपासून कमी झाल्याचे दिसत आहे. गावराण लसूण चारशेच्या पार गेल्याने ग्राहकांना परवडेना, अशी स्थिती आहे. नागपुरातील बहुतांश किरकोळ बाजारात डिसेंबरपासून लसणाच्या किमती चारपटीने वाढल्या. त्यामुळे किरकोळमध्ये दराने किलोमागे ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. विक्रेत्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. 

कळमना आलू, कांदे आणि लसूण अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने भाव दिवसेंदिवस वाढले. मात्र, कळमन्यात चार दिवसांपासून नवीन लसणाचा पुरवठा वाढला आहे. दररोज मध्यप्रदेश (छिंदवाडा) येथून सहा ट्रकची (प्रति ट्रक २० टन) आवक होत आहे. जुना लसूण डिसेंबर महिन्यातच संपला आणि तेव्हा नवीन मालाची आवक फारच कमी होती. थंडीच्या दिवसात मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने लसणाचे भाव गगनाला भिडले. भाव हळूहळू भाव कमी होऊन सामान्यांच्या आटोक्यात येतील.
लसणाची चटणी गायब !

लसणाच्या दरवाढीमुळे अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात आले. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहतील. पण आता आवक वाढताच भाव कमी झाले. त्यानंतरही किरकोळमध्ये ग्राहकाला ४०० ते ४५० रुपये किलो दरानेच लसूण खरेदी करावे लागत आहे. ऐन दिवाळीतही लसूण महागल्याने सामान्यांना थोडी महागाई सोसावी लागली होती.

लसणाचे दर का वाढले?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडला. खराब हवामानामुळे मुख्यत्त्वे लसणाचे पीक खराब झाले आणि दर वाढले. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्राहकांनीदेखील पाठ फिरवली. रोजच्या जेवणामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या लसणाचे दर असेच राहिले तर खायचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

लसणासोबत अद्रकही महाग
गौरव हरडे म्हणाले, खराब हवामानाचा फटका लसणासोबत अद्रक पिकालाही बसला. कळमना घाऊक बाजारात १०० रुपये किलोवर पोहोचलेले अद्रकाचे दर ८० ते ९० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, किरकोळमध्ये २०० रुपये किलो दर आहेत. अद्रक असो वा लसूण किरकोळ विक्रेते रोखीने माल खरेदी करून तब्बल १५ ते २० दिवस साठवणूक करतात. त्यातील काही टक्के माल खराब होतो. त्याची भरपाई म्हणून त्यांना माल जास्त दरात विकावा लागतो.

Web Title: Garlic landed wholesale; But expensive in retail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.