मतिमंदांच्या आयुष्यात बहरणार आनंदाची बाग

By Admin | Updated: December 8, 2014 00:53 IST2014-12-08T00:53:45+5:302014-12-08T00:53:45+5:30

सर्वसाधारण मुलांसाठी सार्वजनिक बाग म्हणजे मोठी आनंदाची ठेवच. परंतु विशेष मुलांचे काय, अशा मुलांना स्वत:चा तोल सांभाळून सरळ रेषेत चालणे सोपे नसते, तेव्हा सामान्य मुलांशी

A garden of joy will grow in the lives of the minds | मतिमंदांच्या आयुष्यात बहरणार आनंदाची बाग

मतिमंदांच्या आयुष्यात बहरणार आनंदाची बाग

त्रिमूर्तीनगरच्या उद्यानात साकारणार ‘थीम पार्क : आज जागतिक मतिमंद दिवस
नागपूर : सर्वसाधारण मुलांसाठी सार्वजनिक बाग म्हणजे मोठी आनंदाची ठेवच. परंतु विशेष मुलांचे काय, अशा मुलांना स्वत:चा तोल सांभाळून सरळ रेषेत चालणे सोपे नसते, तेव्हा सामान्य मुलांशी स्पर्धा करून बागांमधील झोपाळा, घसरगुंडी मिळविणे कसे शक्य आहे. सामान्य मुलांप्रमाणेच खेळण्याचा-बागडण्याचा त्यांनाही आनंद हवा असतो, परंतु अशा बागा कुठेच नाहीत. त्यांना हा आनंद मिळवून देण्यासाठी त्यांची मने फुलविण्यासाठी डॉ. मीनाक्षी वानखेडे मागील चार वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला नुकतेच यश मिळाले असून, नासुप्रच्या त्रिमूर्तीनगर उद्यानात विशेष मुलांसाठी हा ‘थीम पार्क’ उदयास येणार आहे.
सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी-अधिक प्रमाणात ज्या मुलांमध्ये जन्मत: मानसिक अपंगत्व येते, अशा मुलांचा समावेश विशेष (स्पेशल) मुलांमध्ये होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे अशा कोमेजलेल्या बालकांचा जन्म दिवसेंदिवस वाढत आहे. शंभरात अशी तीन मुले जन्माला येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यासोबतच ‘सेरेबल पाल्सी’ची हजारात तीन, ‘आॅटिझम’ग्रस्तांची दहा हजारात सात तर ‘डाऊन सिन्ड्रोम’ची आठशे मुलांमध्ये एक मूल आढळून येते. दरवर्षी हे आजार घेऊन येणाऱ्या मुलांची संख्या तर लाखापेक्षा अधिक आहे. एकट्या नागपुरात एक लाखांवर अशी मुले आहेत. या विशेष मुलांसाठी चालणे हा मुख्य शारीरिक व्यायाम आहे.
परंतु त्यांच्यासाठी हे सोपे नाही. त्यातल्यात्यात सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमुळे त्यांना नेणेही कठीण आहे. अशा मुलांना चार आनंदाचे क्षण मिळण्यासाठी डॉ. मीनाक्षी वानखेडे यांनी ‘थीम पार्क’ची कल्पना मांडली. या पार्कसाठी शहरातील महत्त्वाच्या उद्यानात जागा मिळावी, त्या मुलांना सुरक्षित खेळता यावे म्हणून १०-१२ खेळणी असावी, एवढीच त्यांची मागणी आहे. २०११ पासून त्यांनी ही मागणी अधिकाऱ्यांपासून ते नेत्यापर्यंत लावून धरली आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या थीम पार्कची शिफारस केली आहे. त्यांच्या पत्रामुळे नासुप्रचे अधिकारी कामाला लागले आहेत. प्रायोगिक स्तरावर नासुप्रच्या त्रिमूर्तीनगर उद्यानाची निवड करण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.(प्रतिनिधी)
असे असणार ‘थीम पार्क’
थीम पार्कमध्ये दोन-चार, चार ते आठ व आठ ते पुढील वर्षाच्या मुलांसाठी आवश्यक खेळणीची विभागणी केली आहे. खेळताना सर्व मुले हरखून जावी आणि त्यांच्या पालकांचेही चेहरेही खुलावेत अशी मांडणी डॉ. वानखेडे यांनी केली आहे. उद्यानाच्या प्रवेशापासून रॅलिंग सिस्टम, मऊ प्रकारच्या पायवाटा, बेंचेसवर धरून चढण्यासाठी लोखंडी बार, सुरक्षित खेळण्या व विशेष स्वच्छतागृह आदींचा समावेश असणार आहे. मतिमंदांच्या आयुष्यातील प्रवासात काहीसे स्वावलंबी बनवण्यासाठी या ‘थीम पार्क’चे बळ मिळणार आहे.
पाळणे
थीम पार्कमधील पाळण्यांना सीट बेल्ट लागलेले असतील; सोबतच पाळण्याच्या पाठीमागचा भाग उंच असेल, यामुळे मुले सुरक्षित राहून आनंद घेऊ शकतील.
सी-सॉ
सी-सॉमध्ये मुलांना पकडायला हॅन्डल लावलेले असतील. पाठीला आधार देणारा भाग उंच असेल, सोबतच सीट बेल्टही असणार आहे.
घसरगुंडी
घसरगुंडीच्या परिसरात रबर फोम शीटस् लावलेले असतील. यामुळे मुलगा पडला तरी त्याला लागणार नाही, शिवाय घसरगुंडीचे दोन्ही काठ उंच असतील.
मेरी गो राऊंड
मेरी गो राऊंड या खेळणीत खुर्च्यांचा वापर करून त्यांना सीट बेल्ट लावण्यात येईल. मुलांना पकडण्यासाठी हॅन्डल असेल.

Web Title: A garden of joy will grow in the lives of the minds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.