महापालिकेच्या डस्टबिनच कचऱ्यात, कोण देणार लक्ष?
By मंगेश व्यवहारे | Updated: August 23, 2023 13:29 IST2023-08-23T13:26:06+5:302023-08-23T13:29:57+5:30
या स्टीलच्या कचरा कुंड्या नागपूर मनपाने शहरात ठिकठिकाणी लावल्या आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या डस्टबिनच कचऱ्यात, कोण देणार लक्ष?
नागपूर : ‘स्वच्छ भारत मिशन’वर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्याअंतर्गत कचरा संकलनावर भर देतानाच शहरातील रस्त्यांवर स्मार्ट व आकर्षक कचरा कुंड्या लावून कचरा संकलन केले जात आहे. नागपूर महानगरपालिकेने शहरातील विविध रस्त्यांवर शेड तयार करून त्याखाली स्टीलच्या कचरा कुंड्या लावल्या आहेत. मात्र, त्या कुंड्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने काही कुंड्या कचऱ्यात पडलेल्या आहेत, तर काही चोरीला गेलेल्या आहेत.
‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण करण्याकरिता हिरव्या व निळ्या रंगाच्या कुंड्या वितरित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुका कचरा व ओला कचरा टाकण्यात येतो. याशिवाय रस्त्याच्या कडेनेदेखील स्टीलच्या कचरा कुंड्या लावण्यात आल्या आहेत. त्या कचरा कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी जाऊ नये, याकरिता कुंड्यांवर लोखंडी शेड बनविण्यात आले आहे. त्या शेडवर ‘स्वच्छ भारत अभियान’, असे स्लोगन लिहून कचरा पेटीमध्ये घरातील व दुकानातील कचरा टाकू नये, अशी सूचना देण्यात आलेली आहे.
रस्त्यावर कचरा फेकू नये, याकरिता स्टीलच्या दोन कचरा कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या स्टीलच्या कचरा कुंड्या नागपूर मनपाने शहरात ठिकठिकाणी लावल्या आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रारंभी आकर्षक आणि भक्कम दिसणाऱ्या कचराकुंड्या शहराच्या सौंदर्यात भर घालत होत्या; पण काही काळातच या कचरा कुंड्या एकामागून एक आपल्या ठिकाणाहून गायब होताना दिसत आहेत. नरेंद्रनगर येथील दुर्गा माता मंदिराजवळील स्टीलच्या कचरा कुंडीची अशीच अवस्था आहे. तेथे एक कचरा कुंडी बेपत्ता झाली असून, दुसरी कुंडी जमिनीवर पडलेली आहे.