गणेशपेठ ठाण्याचा एपीआय जेरबंद
By Admin | Updated: July 3, 2015 02:48 IST2015-07-03T02:48:26+5:302015-07-03T02:48:26+5:30
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना गणेशपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) लक्ष्मण माधव केंद्रे याला एसीबीच्या पथकाने जेरबंद केले.

गणेशपेठ ठाण्याचा एपीआय जेरबंद
एक लाखाची लाच : एसीबीने केली कारवाई
नागपूर : एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना गणेशपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) लक्ष्मण माधव केंद्रे याला एसीबीच्या पथकाने जेरबंद केले. गुरुवारी रात्री गांधीसागर तलावाजवळ झालेल्या या कारवाईमुळे गणेशपेठ ठाण्यासह पोलीस यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
नवविवाहित प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आणि नंतर तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या शेख शाहरूख शेख रहेमान (वय २५) या हंसापुरीतील तरुणाला २९ जूनला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर अपहरण आणि बलात्काराचा आरोप लावून पोलिसांनी त्याचा पीसीआरही मिळवला. मुलाला त्रास होऊ नये म्हणून शाहरूखचे वडील शेख रहेमान शेख सुलेमान गणेशपेठ पोलीस ठाण्यात गेले. त्यांना एपीआय केंद्रेला भेटा, असे सांगण्यात आले. केंद्रेशी चर्चा केली असता शाहरुखला घरचे खाणेपिणे आणि इतर सुविधा देण्यासोबतच कोणतीही मारहाण करणार नाही, असे सांगून केंद्रेने दीड लाख रुपयांची लाच मागितली. रक्कम जास्त असल्याचे सांगून ती देण्यास नकार दिल्यामुळे शाहरुखची पिटाई करण्याची भीती दाखवण्यात आली. त्यामुळे रहेमान यांनी लाच देण्याची तयारी दाखवून एसीबीकडे धाव घेतली. शहानिशा झाल्यानंतर एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी सापळ्याचे आदेश दिले. त्यानुसार, उपअधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. केंद्रेने रक्कम स्वीकारताच ाथकाने मुसक्या बांधल्या.
तो ‘साहेब‘ कोण ?
एसीबीने केंद्रेच्या मुसक्या बांधल्याची वार्ता कळताच गणेशपेठ पोलीस ठाण्यात खळबळ निर्माण झाली. दरम्यान, केंद्रेने लाच मागण्यापूर्वी आणि स्वीकारल्यानंतर ‘साहेबांना द्यायचे आहे‘ अशी मखलाशी केली होती, असे समजते. हे ‘साहेब‘ कोण, त्याचा एसीबीचे अधिकारी तपास करीत आहेत. दरम्यान, केंद्रेला पकडल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या निवासस्थानी झडती सुरू केली. त्यात काय मिळाले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.