Ganesh Festival 2019; सळसळत्या तरुणाईचा गजर; ढोल-ताशा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:13 AM2019-09-02T11:13:03+5:302019-09-02T11:16:12+5:30

श्रीगणेशाच्या आगमनासोबतच ढोल-ताशांच्या गर्जनेचा ज्वर चढायला लागला असून... पयलं नमनं हो, करितो गर्जनं, अमुचं वादनं हो, श्रीगणपती अर्पणं.. असा घोष व्हायला लागला आहे.

Ganeshotsav 2019; Drum squads | Ganesh Festival 2019; सळसळत्या तरुणाईचा गजर; ढोल-ताशा पथके

Ganesh Festival 2019; सळसळत्या तरुणाईचा गजर; ढोल-ताशा पथके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्याकडील मनोवृत्ती उत्सवी प्रकारची आहे आणि जल्लोष साजरा करण्यासाठी निमित्ताची गरज येथील संस्कृतीला नाही. केवळ संधी मिळावी आणि आपला उत्साह उत्सवरूपातून प्रज्वलित करावा, ही या भूमीची परंपरा राहिली आहे. त्यात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आणि येथील कुठलीही परंपरा प्रथम श्रीगणेशास अर्पण असते. त्याच अनुषंगाने, गेल्या काही काळापासून ढोल-ताशांची गर्जना येथील उत्सव-महोत्सवांना वेगळीच चकाकी प्रदान करीत आहे. श्रीगणेशाच्या आगमनासोबतच ढोल-ताशांच्या गर्जनेचा ज्वर चढायला लागला असून... पयलं नमनं हो, करितो गर्जनं, अमुचं वादनं हो, श्रीगणपती अर्पणं.. असा घोष व्हायला लागला आहे.
महाराष्ट्राची भूमी छत्रपतींच्या कर्तृत्वाने पावन झाली आहे. मध्यंतरी त्या कर्तृत्ववान परंपरेची मुळं जरा शिथिल पडली होती. मात्र, युवावर्गाने आपल्या उज्ज्वल परंपरेची कास धरली आणि डीजे, इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या या काळात परंपरागत ढोल-ताशांना नवसंजीवनी देत, देशातच नव्हे तर जगभराला भुरळ पाडली आहे. आजघडीला एकट्या नागपुरात ४० हून अधिक ढोल-ताशा पथकांची शृंखला निर्माण झाली असून, खास नागपूरकर पथकांना वादनासाठी देशभरातून आमंत्रणे धाडली जात आहेत. गेल्या तीन महिन्यापासून या पथकांनी खास श्रीगणेशोत्सवासाठीची तयारी केली आहे. ही सगळी पथके आपले पहिले वादन श्रीगणेशास अर्पण करून, पुढे देशभरात मराठमोळ्या संस्कृतीची गर्जना करण्यास सिद्ध झाले आहेत. नागपुरात गेल्या वर्षी ३२ पथकांची नोंद होती. त्यात या वर्षात आणखी सात-आठ पथकांची भर पडली असल्याचे दिसून येत आहे.
वर्तमानात स्वराज्य गर्जना ढोल-ताशा पथक, शिवप्रतिष्ठा ढोल-ताशा पथक, गजवक्र ध्वज पथक, विठुमाऊली वाद्य पथक, बेधुंद ढोल-ताशा पथक, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य ढोल-ताशा पथक, श्रीराम राज्य ढोल-ताशा पथक आदी पथके देशभरात आपला डंका पिटत आहेत. मौदा, कोराडी, सावनेर अशा तालुक्याच्या ठिकाणीही ही पथके निर्माण झाली असून, संपूर्ण जिल्हा श्रीगणेशोत्सवात ढोल-ताशाच्या गजरात नर्तन करणार आहे.
बेधुंद ढोल-ताशा पथक
पंकज बोरकर व श्रेय फाटे यांच्या संकल्पनेतून २०१४ मध्ये हे पथक आकाराला आले. आजघडीला या पथकात ११० वादक वेगवेगळ्या क्षेत्रातून हौसेखातर दररोज एकत्र येतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीला मथुरेतील रंग महोत्सवात, हैदराबाद आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये हे पथक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, पथकाद्वारे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कायम पुढाकार घेतला जातो. श्रीगणेशोत्सवातून मिळणारा निधी पूरग्रस्तांसाठी वाटला जाणार असल्याची माहिती पथकाचे व्यवस्थापक अमेय पाण्डे यांनी दिली. यंदाच्या महोत्सवात विशेषत्वाने ५१ ध्वज नाचवण्यासोबतच झांजचा कर्षण घुमणार आहे.
श्रीराम राज्य ढोल-ताशा पथक
मंदार सुगवेकर व मंदार गढीकर यांनी या पथकाची स्थापना २०१८ मध्ये केली. आजघडीला १५० हून अधिक तरुण-तरुणी या पथकात सामील आहेत आणि एका वर्षातच वेगवेगळ्या ठिकाणी वादनाचे अनेक कार्यक्रम या पथकाने केले आहेत. श्रीगणेशाच्या आगमनापासून यंदाच्या मोसमातील वादनाचा कार्यक्रम निनादणार असल्याचे ताशा प्रमुख गौरव कोल्हे व सदस्य क्षितिज वासनिक यांनी सांगितले.
शिवमुद्रा ढोल-ताशा पथक
स्वत:चे स्वतंत्र असे महिला पथक असणारे शिवमुद्रा ढोल-ताशा पथक हे विदर्भातील पहिले पथक आहे. जयंत बैतुले यांच्या संकल्पनेतून २०१३ मध्ये हे पथक आकाराला आले. वर्तमानात बैतुले यांच्यासह गजानन जोशी, पराग बागडे, अमित पाण्डे व जय आस्कर या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. पथकातील तरुणांची एकूण संख्या ३१५ असून, त्यात १०६ मुलींचा समावेश आहे. एकाच समूहात फाटे नकोत म्हणून, हे पथक एका वेळी एकच कार्यक्रम करते आणि त्यात संपूर्ण टीम सहभागी असते. दिल्ली, आगरा, जयपूर, राजस्थान आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या पथकाने प्रवास केला असून, या वर्षातही अनेक ठिकाणाहून आमंत्रणे प्राप्त झाल्याचे जय आस्कर यांनी सांगितले.
शिवसाम्राज्य ढोल-ताशा पथक
गणेश डोईफोडे यांनी २०१५ मध्ये या पथकाची स्थापना केली आणि आजघडीला या पथकात ८८ युवक-युवतींचा समावेश आहे. संपूर्ण गणेशोत्सवातील त्यांच्या तारखा निश्चित झाल्या असून, यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी या पथकाने विशेष अशा श्लोकांवर आधारित वादनाची तयारी केली आहे. त्यात हनुमंत, गणपती, श्रीराम, विठ्ठल, शिवराय आदींच्या स्तुतींची लय वादनात असणार आहे. श्रीगणेश विसर्जनासाठी हैदराबाद येथील कलिंगनगर व तेलंगणा येथील वारांगलतर्फे आमंत्रण या पथकाला मिळाले आहे.

Web Title: Ganeshotsav 2019; Drum squads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.