गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार  : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:50 PM2020-01-30T23:50:21+5:302020-01-30T23:51:07+5:30

महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.

Gandhi's life is his idea: Suresh Dwadashiwar | गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार  : सुरेश द्वादशीवार

गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार  : सुरेश द्वादशीवार

Next
ठळक मुद्देजागतिक अहिंसा दिन आयोजन समितीची व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.
जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती आणि स्वयंम् सामाजिक संस्थेच्या वतीने विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात सुरेश द्वादशीवार यांचे ‘सामाजिक एकतेसाठी गांधी विचारांची गरज’ या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. व्याख्यानात द्वादशीवार म्हणाले, धर्म ही केवळ माणसांना संघटित करणारीच नव्हे तर दूर करणारीही व्यवस्था आहे. भारतासह जगाच्या पाठीवर धर्माच्या नावाखाली अनेक लढाया झाला. धर्मातच नव्हे तर धर्माच्या पंथातही लढाया झाल्या. १४ व्या शतकात १२ कोटींपैकी ४० लाख माणसे या लढाईत मारली गेली. म्हणूनच वैर विसरा आणि एकत्र या, असे आवाहन गांधी करायचे.
धर्म हा मानवनिर्मित आहे. मात्र यापुढेही माणुसकीचा धर्म व्यापून उरतो. देशाच्या फाळणीनंतर दंगली उसळल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी त्या शमविण्यासाठी फिरत राहिले. कोलकात्यामध्ये दंगली पेटल्यावर ते पाकिस्तानचे नेते शहीद सुरावर्दी यांना सोबत घेऊन गल्लीबोळातून शांततेचे आवाहन करत फिरत होते. ३० ऑगस्टला एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी मुक्कामाला असताना त्यांच्यावर बाहेरील व्यक्तींनी हल्ला केला. डोक्यावर सुरा मारला. देश स्वातंत्र्याचा आनंद लुटत असताना गांधी मात्र शांतीचे आवाहन करीत मार खात फिरत होते. ३० जानेवारी या गांधी हत्येचा प्रसंगही त्यांनी व्याख्यानातून उभा केला. ज्या महात्म्याने आयुष्यभर अहिंसा सांगितली, त्यांचाच शेवट हिंसेतून झाला. त्यातूनही जगात अहिंसेचाच संदेश गेला, हीच त्यांच्या आयुष्याची खरी ताकद आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी प्रास्ताविक विलास मुत्तेमवार यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विशाल मुत्तेमवार यांनी मानले.

‘ही’ तर गांधींची दुसरी हत्याच
इंग्रज सरकारने आणलेला रौलट अ‍ॅक्ट हा भारतीयांना गुलाम करणारा आणि भारतीयांचे हक्क हिसकावणारा कायदा होता. २०२० च्या प्र्रारंभी देशात येऊ घातलेले कायदे देशातील अल्पसंख्यकांवर असेच अन्याय करणारे आहेत. वर्षानुवर्षे हयात घालविणाऱ्यांना प्रमाणपत्र मागणे ही गांधींची दुसरी हत्याच आहे, अशी टीका द्वादशीवार यांनी केली.

Web Title: Gandhi's life is his idea: Suresh Dwadashiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.