क्षुल्लक भांडणावरून झाला ‘गेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST2021-04-01T04:09:21+5:302021-04-01T04:09:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : जुन्या क्षुल्लक भांडणाच्या कारणावरून आरोपी आणि मृत यांच्यात सतत दोन दिवस वादविवाद, भांडण आणि ...

'Game' over trivial quarrel | क्षुल्लक भांडणावरून झाला ‘गेम’

क्षुल्लक भांडणावरून झाला ‘गेम’

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : जुन्या क्षुल्लक भांडणाच्या कारणावरून आरोपी आणि मृत यांच्यात सतत दोन दिवस वादविवाद, भांडण आणि मारहाण असा प्रकार घडला. सतत मारहाणीचा प्रकार होत असल्याने आता त्याला संपवायचेच असा क्रूर विचार आरोपीच्या डोक्यात शिरला. यातूनच उमरेड कावरापेठ येथील अक्की बारसमोर हत्याकांड घडले. अगदी क्षुल्लक कारणावरून मंगळवारी (दि. ३०) रात्री ८.४२ वाजताच्या सुमारास दोघांनी चाकूचे सपासप वार करीत ‘गेम’ केला. या खुनाचा काही मिनिटांचा संपूर्ण घटनाक्रम अक्की बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

संदीप ऊर्फ संजय ईस्तारी खवास (३८, रा. कावरापेठ, उमरेड) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी महादेव बाळकृष्ण मोहीनकर (२४, रा. कावरापेठ, उमरेड) आणि त्याचा मामेभाऊ विजय रवींद्र डहारे (२३, रा. नागोबा चौक, कुही) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मृत संजय खवास हा एका कारखान्यात कामगार होता. आरोपी महादेव मोहीनकर हा सुद्धा मोलमजुरी करतो. मृत संजय आणि कावरापेठ येथील किशोर धोटे यांचे काैटुंबिक संबंध होते. २९ मार्च रोजी किशोर धोटे यांच्याकडे आरोपी महादेव मोहीनकर हा काही रक्कम मागण्यासाठी गेला असता, मृत संजयसुद्धा तेथे हजर होता. जुन्या भांडणावरून मृत संजय आणि आरोपी महादेव मोहीनकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. वादविवाद आणि मारहाणसुद्धा झाली. त्यानंतर पुन्हा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उमरेड कळमना चौक परिसरात मृत संजय आणि आरोपी महादेव यांच्यात चांगलीच जुंपली. पुन्हा वाद विकोपाला गेला.

अशातच आरोपी महादेव मोहीनकर याने आपला मामेभाऊ विजय डहारे याला पाळत ठेवायला लावत घर गाठले. घरातून धारदार शस्त्र आणत संगनमताने संजयवर चाकूने वार करीत त्याचा खून केला. कुही येथील विजय डहारे हा होळीनिमित्त उमरेड येथे महादेव मोहीनकर याच्या घरी आला होता. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी शरणागती पत्करली. दोन्ही आरोपींकडून दोन चाकू पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणात अन्य काही आरोपी आहेत काय, याचाही शोध घेतला जात आहे. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ (३४), सहकलम ३, २५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.

....

३ एप्रिलपर्यंत कोठडी

आरोपी महादेव मोहीनकर आणि विजय डहारे या दोघांनाही बुधवारी उमरेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृत संजय खवास याचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन ते अंत्यविधीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले. दरम्यान दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले होते.

....

चाकूचे १२ वार

मंगळवारी आरोपी महादेव मोहीनकर आणि मृत संजय खवास यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर विजय डहारे या आपल्या मामेभावाला बारसमोर पाळत ठेवावयास सांगितले. मृत संजय खवास बारमधून ८.४२ वाजता बाहेर पडताच दोन्ही आरोपींनी चाकूने मानेवर, छातीवर आणि पोटावर ११ ते १२ वार केले. मृत संजय खवास रक्ताच्या थारोळ्यात जागीच ठार झाला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.

Web Title: 'Game' over trivial quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.