गजभिये हरले - पण जिंकलेही!

By Admin | Updated: June 26, 2014 01:02 IST2014-06-26T01:02:17+5:302014-06-26T01:02:17+5:30

दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी

Gajbiya loses - but won! | गजभिये हरले - पण जिंकलेही!

गजभिये हरले - पण जिंकलेही!

एकत्रीकरणातून नवनेतृत्वाचा उदय : दलित राजकारणाला नवी दिशा
नागपूर : दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी सनदी अधिकारी दिसला व समाजही एक पाऊल पुढे एकत्र आला. राजकीय संधीसाधूंना बाजूला सारत आंबेडकरी समाजात कर्मनिष्ठ नवे नेतृत्व विकसित व्हायला सुरुवात झाली, हा या निवडणुकीने दिलेला बोध आहे. सत्तेसाठी समाजाचा वापर करणाऱ्यांना बाजूला सारून नवनेतृत्व निर्माण करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पदवीधरच्या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी समाज एकत्रीकरणाच्या पहिल्याच लढ्यात ते जिंकले आहेत.
सत्ता, पद, स्वार्थासाठी कधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे फरफटत जायचे, तर कधी महायुतीत सहभागी होण्याच्या नावाखाली आपले अस्तित्व दुय्यम करून घ्यायचे. रिपाइंच्या एखाद्या गटाला हाताशी धरायचे, त्यांना पद द्यायचे व त्यांना मानणारे दलित मतदार स्वत:कडे वळवून घ्यायचे, असा प्रयोग सर्वच पक्ष करीत आले आहेत. असे प्रकार पाहून दलित समाजातील सुशिक्षित तरुणांच्या मनात एक सल निर्माण झाली. दलित तरुणांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा निर्धार केला. तो निर्धार बऱ्यापैकी वास्तवातही उतरवून दाखविला. त्यामुळे गेल्या आठ- दहा वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वावर असलेले डॉ. बबनराव तायवाडे २२ हजारावर थांबले.
तर, गेल्या वर्षभरापासून समाजाला संघटित करणारे, जागृती निर्माण करणारे किशोर गजभिये हे १९ हजारावर पोहचले. या निवडणुकीने दलित, बहुजन मतदार किती एकवटला याचा प्रत्यय आला. गजभिये भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी होते. विदर्भ वैधानिक मंडळाचे पहिले सदस्य सचिव होते. विक्रीकर उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम केले.
मतदारांनी दाखवून दिली ताकद
स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी समाजाला एकत्र करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. पदवीधरच्या प्रचारात ते एकत्रीकरणाचा विचार घेऊनच उतरले. आपण ही निवडणूक आमदार होण्यासाठी नव्हे तर आंबेडकरी, शोषित, मागास समाजाला एकत्र करण्यासाठी लढत आहोत, हे त्यांनी मतदारांना पटवून दिले.
मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या सुशिक्षित दलित मतदाराला त्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली. गजभिये हरले तरी वाघासारखे लढले. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांना विचार करायला लावणारी मते त्यांनी घेतली. भविष्यात दलित राजकारणाची दिशा कशी असेल याचा प्रत्यय देणारी निवडणूक आहे. या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी भविष्यात आपण एकवटलो तर काय करू शकतो याची ताकद मतदारांनी दाखवून दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gajbiya loses - but won!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.