उन्हाळ्यात गजबजली काठोडाची शाळा इतरांसाठी आदर्श
By Admin | Updated: May 10, 2014 23:51 IST2014-05-10T23:51:50+5:302014-05-10T23:51:50+5:30
जिल्हा परिषद शाळा म्हटले की, विद्यार्थ्यांची दांडी, मुख्यालयी न राहणारे शिक्षक, रोडावलेली पटसंख्या आणि पालकांची उदासीनता असे चित्र डोळ्यापुढे येते.

उन्हाळ्यात गजबजली काठोडाची शाळा इतरांसाठी आदर्श
नि:शुल्क शिबिरात शिक्षक देत आहे विद्यार्थ्यांना धडे
हरिओम बघेल - आर्णी(यवतमाळ)
जिल्हा परिषद शाळा म्हटले की, विद्यार्थ्यांची दांडी, मुख्यालयी न राहणारे शिक्षक, रोडावलेली पटसंख्या आणि पालकांची उदासीनता असे चित्र डोळ्यापुढे येते. इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढत असताना जिल्हा परिषद शाळेला नाक मुरडले जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा येथील जिल्हा परिषद शाळा मात्र त्याला अपवाद आहे. वर्षभर ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक उन्हाळ्यातही विशेष शिबिर घेऊन विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्य शिकविले जात आहे. उन्हाळ्याच्या सुटीतही कोठोडाची शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहे. जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असल्याचे चित्र सर्वदूर आहे. ग्रामीण भागातही खासगी शाळांचे आक्रमण वाढत आहे. परंतु असे असताना कोठोडाची शाळा मात्र वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकर्षित करते. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात ही शाळा असा उपक्रम राबविणारी एकमेव असावी. वर्षभर विद्यार्थ्यांना खेळातून इंग्रजी शिकविले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला जातो. प्रत्येक भिंत बोलकी करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालते. विविध उपक्रमात पालकांचाही सहभाग असतो. वर्षभर चालणार्या या उपक्रमासोबतच उन्हाळी सुट्यांचाही सदुपयोग ही शाळा करीत आहे. यावर्षी शाळेत उन्हाळी शिबिर आयोजित केले. नि:शुल्क शिबिरात सर्व विद्यार्थी उपस्थित असतात. कुंडी सजावट, वाढदिवस, शुभेच्छापत्र तयार करणे, चित्रकला, मातीपासून विविध वस्तू तयार करणे, अभिनय कौशल्य शिकविले जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्यातही शिक्षक या विद्यार्थ्यांना मन लावून मार्गदर्शन करताना दिसत आहे. कुणी या शिक्षकांना आदेश दिला नाही की कुणाची जबरदस्ती नाही. केवळ विद्यार्थी प्रेमातून हे शिक्षक हा उपक्रम राबवीत आहे. कधी काळी शिक्षकांबद्दल असलेला दुराग्रहही या उपक्रमामुळे बदलला आहे. शिक्षकांची संवेदनशीलता या विद्यार्थ्यांना आदर्श बनविणार, यात गावकर्यांना कोणतीही शंका नाही. आमच्या मुलांवर शिक्षक शिक्षणासोबतच सुसंस्कार करीत असल्याने समाधान वाटते, असे गणेश ढाकूलकर या पालकाने सांगितले. शाळेला नावारुपास आणण्यासाठी मुख्याध्यापिका शारदा काळे, तेजेंद्र चौधरी हे शिक्षक परिश्रम घेत आहेत. संपूर्ण विदर्भात कुठेही उन्हाळ्यात असा उपक्रम सुरू नसेल. मात्र आर्णी तालुक्यातील कोठोडाच्या शाळेने हा उपक्रम सुरू करून इतर शाळांपुढे आदर्शच निर्माण केला आहे.