गफ्फार अली खुनातील शूटरला बंगालमध्ये अटक

By Admin | Updated: June 21, 2014 02:44 IST2014-06-21T02:44:44+5:302014-06-21T02:44:44+5:30

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग औरंगजेब चौक येथे कुख्यात समशेरचा भाऊ गफ्फार अली रमजान अली ..

Gaffar Ali killer shooter arrested in Bengal | गफ्फार अली खुनातील शूटरला बंगालमध्ये अटक

गफ्फार अली खुनातील शूटरला बंगालमध्ये अटक

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग औरंगजेब चौक येथे कुख्यात समशेरचा भाऊ गफ्फार अली रमजान अली याच्यावर देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून त्याचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांना जखमी करणाऱ्या दोन फरार शूटरपैकी एकाला पश्चिम बंगालमध्ये अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला.
मिनारूल इस्लाम रमजान मंडल (२४), असे आरोपीचे नाव असून तो पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील डोमकल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुचियामोडा येथील रहिवासी आहे. त्याचे दोन साथीदार अमान मंडल आणि अनवर अब्बू बकर मंडल हे अद्याप फरार आहेत. आतापर्यंत या खुनात मिनारूलसह कलीम खान तसलीम खान, त्याचा भाऊ अलीम खान, महफूज अहमद कबुल हसन, अशा चौघांना अटक करण्यात आलेली आहे.
गफ्फारच्या खुनातून फरार झाल्यानंतर मिनारूल याला मुर्शिदाबाद पोलिसांनी देशीकट्ट्यासह अटक केली होती. ही माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी मुर्शिदाबादच्या न्यायालयात या आरोपीचा स्थानांतर आदेश प्राप्त केला आणि त्याला बेहरमपूर कारागृहातून ताब्यात घेऊन आज सकाळी नागपुरात आणले.
गफ्फार अलीच्या खुनाची घटना २५ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास हसनबागच्या औरंगजेब चौकातील गफ्फारच्या चहा टपरीजवळ घडली होती. वाठोडा येथील जमिनीच्या वादातून गफ्फार अली याच्यावर चार गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. याशिवाय इब्राहिम खान अकबर खान रा. हसनबाग आणि संजित अशोक दमाहे रा. गिड्डोबानगर वाठोडा यांच्यावरही गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, वाठोडा येथील जमीन समशेर अली आणि इतरांनी विकत घेण्याचा मूळ मालकासोबत करारही केला होता.
त्यानंतर ही जमीन समशेर अली याने कलीम खान याला विकली होती. पुढे ही जमीन कलीम खान याने आपला जावई अब्रार याच्या नावे स्थानांतरित करून दिली होती. कलीम खान आणि इतरांनी याच जमिनीचा विक्री करारनामा संजय अवचट याच्यासोबत केला होता. या सौद्यानंतर समशेरने कलीम खान याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा सपाटा सुरू केला होता. परिणामी समशेरचा कायमचा काटा काढण्याची योजना कलीम आणि अलीम खान यांनी आखली होती. या कटात त्यांनी महफूज अहमद याला सामील केले होते.
आपल्याच एका बांधकामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या अमान मंडल याला कलीमने आपल्या योजनेबाबत सांगितले होते. पश्चिम बंगाल मुर्शिदाबादचा मूळ रहिवासी असलेल्या अमान याने मिनारूल आणि अनवर या शॉर्प शूटर्सना सुपारी देऊन नागपुरात आणले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी गोळ्या झाडून गफ्फारचा खून तर अन्य दोघांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर कलीम खान याने मारेकऱ्यांना पैसे देऊन पसार केले होते.
या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डी. एस. ढोले यांनी आरोपी मिनारूल याला न्यायालयात हजर केले.
आरोपीच्या अन्य दोन साथीदारांना अटक करावयाची आहे आणि आणखी एक अग्निशस्त्र जप्त करणे आहे, आदी मुद्दे उपस्थित करून आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Gaffar Ali killer shooter arrested in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.