गडचिरोलीतील १०० वर केंद्रप्रमुख झाले ‘टेक्नोसॅव्ही’
By Admin | Updated: May 19, 2017 15:31 IST2017-05-19T15:31:31+5:302017-05-19T15:31:31+5:30
शालेय पोषण आहारासह केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती शासनाला तत्काळ आॅनलाईन सादर करता यावी, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच १०३ केंद्रप्रमुखांसाठी लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत.

गडचिरोलीतील १०० वर केंद्रप्रमुख झाले ‘टेक्नोसॅव्ही’
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : शालेय पोषण आहारासह केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती शासनाला तत्काळ आॅनलाईन सादर करता यावी, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच १०३ केंद्रप्रमुखांसाठी लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे केंद्रप्र्रमुख आता या टॅपटॉपचा वापर करून माहिती शासनाकडे पाठवित आहेत. गडचिरोलीसारख्या मागास क्षेत्रात केंद्र प्रमुखांचे हे ‘टेक्नोसॅव्ही’ होणे प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल ठरले आहे.
शासनामार्फत शिक्षण विभागात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा आढावा दर आठवड्याला किंवा दरदिवशी शासनाला सादर करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यभरातील सर्वच केंद्रप्रमुखांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
सदर लॅपटॉप शालेय पोषण आहार विभागामार्फत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा आढावा घेण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर आली आहे. त्याचबरोबर ज्या शाळेत नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध नाही, अशा शाळेतील शिक्षक केंद्रस्तरावर जाऊन लॅपटॉपच्या मदतीने माहिती भरू शकणार आहेत. लॅपटॉपमुळे केंद्र प्रमुखांचे काम गतिमान झाले असून वेळही वाचत आहे.